---Advertisement---
जळगाव : शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी महानगरपालिकेने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. पालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या मोहिमेअंतर्गत, शहरातील जन्माची आणि विवाहाची नोंदणी, तसेच विविध ठेकेदारांकडे काम करणाऱ्या मजुरांची माहिती तपासली जाईल. तसेच, बेकायदेशीररित्या मिळवलेली आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांचीही पडताळणी केली जाईल. रस्त्यावर विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांची माहिती गोळा केली जाणार आहे.
याव्यतिरिक्त, घरमालकांना त्यांच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक केले आहे. शहरात कोणत्याही बांगलादेशी नागरिकाला भाड्याने घर देऊ नये, अशी ताकीदही घरमालकांना देण्यात आली आहे.
या कामात महानगरपालिका पोलिस विभागाचेही सहकार्य घेणार असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. शहरात कुठेही बांगलादेशी नागरिक आढळल्यास, त्यांची सर्व कागदपत्रे तपासली जातील आणि ती अवैध आढळल्यास रद्द करण्यात येतील. नागरिकांनी कोणत्याही बांगलादेशी व्यक्तीला कामावर ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.