---Advertisement---
धरणगाव तालुक्यातील मौजे लाडली येथील शेतकरी शिवाजी दलपत सोनवणे यांनी आपल्या जमिनीवरील बेकायदेशीर ताबा हटवून ती परत मिळावी या मागणीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवार १४ रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
लाडली येथे गट क्र. ५४ या शेतजमिनीच्या ताब्यासाठी त्यांनी ३३ दिवसांपूर्वी तहसीलदार, धरणगाव यांच्याकडे अर्ज दाखल केला होता, मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिवाजी सोनवणे यांनी ३ जुलै २०२५ रोजी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि न्यायालयीन आदेशांसह तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. ३३ दिवस उलटूनही त्यांच्या अर्जावर कोणतीही सुनावणी झाली नाही.
प्रशासनाच्या या निष्क्रिय भूमिकेमुळे आणि विलंबामुळे शेतकऱ्याच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेचा निषेध म्हणून, शिवाजी सोनवणे १४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय आमरण उपोषण सुरू करणार आहेत.
उपोषणादरम्यान ते आपल्या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, न्यायालयीन आदेश आणि संवैधानिक हक्कांबद्दल जनजागृती करणारी माहिती लोकांसमोर ठेवणार आहेत. जर उपोषणादरम्यान आपल्या आरोग्यास किंवा जीवितास काही धोका निर्माण झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही सोनवणे यांनी दिला आहे.
शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या
- गट क्र. ५४ वरील ताबा अर्जावर तत्काळ सुनावणी घेऊन जमिनीचा ताबा मूळ मालकास परत द्यावा.
- धरणगाव तहसीलदारांच्या निष्क्रियतेची शिस्तभंग चौकशी करावी.
- अशा प्रकरणांची जलद चौकशी आणि निकाल देण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी.