---Advertisement---
बांगलादेशातून भारतात येऊन स्थायिक होणाऱ्यांना मदत करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बांगलादेशातून येणारे मुस्लिम नागरिक भारतीय नागरिक होण्यासाठी हिंदूंना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करतात, असा धक्कादायक प्रकार घडत आहेत. अशाच एका प्रकरणात पोलिसांनी एका मुस्लिम महिलेला अटक केली असून ती एका हिंदू तरुणाशी लग्न करुन येथे राहत होती. या महिलेचे नाव मंजू शर्मा उर्फ अल्ताफ शेख असे आहे. ही महिला बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात आली होती. तिची चौकशी केली असता तिने बनावट भारतीय ओळखपत्रे तयार करून वर्षानुवर्षे परदेशी नागरिकांना देशात स्थायिक करण्यात सक्रिय असलेल्या नेटवर्कबाबत माहिती दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफने सांगितले की, बांगलादेशी नागरिकांची पश्चिम बंगालमध्ये एजेंटच्या माध्यमातून बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवली जातात. याचा वापर करीत आधार कार्ड बनविले जातात. कागदपत्रे हातात येताच, हे घुसखोर भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवले जातात. येथे ते सामान्य लोकांप्रमाणे त्यांची ओळख लपवून स्थानिक नागरिकांप्रमाणे वास्तव्य करण्याचा प्रयत्न करतात.
सूत्रांनी सांगितले की, या टोळीच्या खास रणनीतीमध्ये प्रेम आणि लग्नाचाही समावेश आहे. अल्ताफ शेखने कबूल केले की, महिला घुसखोर विशेषतः हिंदू पुरुषांना लक्ष्य करतात, तर पुरुष घुसखोर हिंदू मुलींशी लग्न करून देशात कायमचे राहू इच्छितात.
अल्ताफ शेख अशी बनली मंजू शर्मा
अल्ताफ शेखने स्वतः एजेंटच्या माध्यमातून भारतात प्रवेश मिळविला आहे. ती प्रथम पश्चिम बंगालमध्ये आली. तेथे बनावट कागदपत्रे तयार केली आणि नंतर मुंबई गाठली. मुंबईमध्ये एका बारमध्ये पुरुषोत्तम प्रसाद शर्मा यांची भेट घेतली. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, आणि त्याच्यासोबत लग्न केले. त्यानंतर, ती अनेक वर्षे मंजू शर्मा या नावाने भारतात राहत होती. तिचे आधार कार्ड देखील पुरुषोत्तमने बनावट कागदपत्रांच्या मदतीने बनवले होते. मुंबई गुन्हे शाखेने ३ ऑगस्ट २०२५ रोजी अल्ताफ आणि तिच्या पतीला अटक केली. या रॅकेटची मुळे देशातील इतर अनेक राज्यांमध्ये पसरलेली असू शकतात असा पोलिसांना संशय आहे.
मागील तीन महिन्यांत मुंबई पोलिसांनी सुमारे एक हजार बांगलादेशी नागरिकांना देशातून हद्दपार केले आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे आणि पोलिसांना या टोळीशी संबंधित आणखी नावे पुढे येण्याची शक्यता आहे.