चोरट्यांनी भरदिवसा बंद घराला केले लक्ष्य, घरातील रोख रकमेसह सोन्याचा दागिना लंपास

---Advertisement---

 

Crime News : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याचा दागिना लंपास केला. विशेष म्हणजे गजबजलेल्या व सतत वर्दळीचा परिसर असलेल्या भागात भरदुपारी ही घरफोडीची घटना घडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळनेर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी शनिवारी दुपारी पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील सुमननगर भागात १५ ऑगस्टला दुपारी दीडच्या सुमारास सुपडू पाखले यांनी त्यांच्या मनुश्री किराणा दुकानाचे शटर व राहत्या घराला कुलूप लावून ते त्यांची पत्नी वैशाली पाखले असे दोघेही मुलगी, जावई व नातवंडे यांना भेटण्यासाठी बसने नंदुरबार येथे गेले होते. दरम्यान, मुलीच्या घरी नंदुरबार येथे पोहोचल्यावर त्यांच्या घराशेजारी राहणारे हरीश गुजराथी यांनी पाखले यांना दुपारी चारच्या दरम्यान भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे. तुम्ही दरवाजा उघडा ठेवून गेले का? असे सांगितले. त्या वेळी पाखले यांनी सांगितले की, मी दरवाजा लावला आहे. तरी तुम्ही खात्री करा. त्यावर त्यांनी खात्री करून सांगितले की, तुमच्या घराच्या दरवाजाचे कुलूप हे तोडलेले आहे व घरातील कपाट अस्ताव्यस्त पडलेले आहे. असे सांगितल्यावर पाखले हे पत्नी, जावई व मुलीसह खासगी वाहनाने नंदुरबार येथून सायंकाळी साडेसहाच्या सुमारासपिंपळनेर येथील सुमननगरमधील राहत्या घरी दाखल झाले.

घरी येताच त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलले दिसले. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले व दुकानातील गल्ला अस्ताव्यस्त पड़लेला आढळून आला. दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम व कपाटात ठेवलेला सोन्याचा अखंड तुकडा या वस्तू आढळून आल्या नाहीत.

चोरट्यांनी घरात शिरून १६ हजार ६० रुपये रोख रक्कम व दोन लाख ४८ हजार रुपये किमतीचा २५ ग्रॅमचा सोन्याचा अखंड तुकडा, असा सुमारे दोन लाख ६४ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांनी तपासाला गती देऊन चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याप्रकरणी सुपडू जगन्नाथ पाखले (वय ५८) यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक संदीप संसारे तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---