---Advertisement---
शेतास तारेचे कुंपण करून त्यात वीजप्रवाह सुरू करून आदिवासी समाजातील एकाच परिवारातील पाच सदस्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वरखेडी (ता. एरंडोल) येथील शेतमालक बंडू युवराज पाटील यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह अन्य दोन गुन्हे दाखल करण्यात आले. गुरुवारी (२१ ऑगस्ट) रात्री अकराच्या सुमारास बंडू पाटील यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्या पाचही जणांवर त्यांच्या मूळ गावी ओसरणी (मध्य प्रदेश) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्घटनेत बचावलेली दीड वर्षाच्या दुर्गास तिच्या आजोबांच्या स्वाधीन करण्यात आले. शेतमालक बंडू पाटील यांच्याविरुद्ध वीज वितरण कंपनी व वनविभागानेदेखील गुन्हा दाखल केला आहे.
वरखेडी येथील शेतकरी बंडू युवराज पाटील यांनी वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी कोणतीही परवानगी न घेता शेताला तारेचे कुंपण करून त्यामध्ये वीजप्रवाह सोडला होता. मध्य प्रदेशातील ओसरणी येथील एकाच कुटुंबातील सासू, मुलगी, जावई व तीन लहान नातवंडे असे सहा सदस्य रोजगाराच्या शोधासाठी वरखेडी आले होते. रात्री आदिवासी परिवारातील सर्व सदस्य बंडू पाटील यांच्या शेतात थांबले होते.
शेतात तारेच्या कुंपणात सोडलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसून लीलाबाई जामसिंग पावरा (वय ६०), विकास रामलाल पावरा (वय ३०), सुमन पावरा (वय २५), पावन पावरा (वय ४) व कवल (वय ३) या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दुर्गा झोपलेली असल्याने या दुर्घटनेत सुदैवाने बचावली होती.
पाचही आदिवासींचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला का घातपात आहे, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता. घटनास्थळी श्वानपथकासह फॉरेन्सिक टीमचे कर्मचारीही दाखल झाले होते. मृत्युमुखी पडलेल्या पाचही जणांच्या हातावर व पायावर विजेच्या तारांचा शॉक लागल्याच्या खुणा दिसत होत्या. याच शेतात विजेचा धक्का बसून दोन रानडुकरेही मृत्युमुखी पडली होती.
पाच आदिवासींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्यासह वीज वितरण कंपनी, वनविभाग, महसूल प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले होते. शेतमालक बंडू युवराज पाटील यांच्या निष्काळजीमुळे पाच निरपराध व्यक्तीच्या मृत्यू झाल्याने त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाकःल करण्यात आला,
तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शेताच्या तारेचे कुंपण काढून, तसेच वीजपुरवठा करणारी वायर काढून शेतातील पत्री शेडमध्ये लपवून ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने दोन रानडुकरे मृत्युमुखी पडल्याने वनविभागाने बंडू पाटील यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरखेडी येथील विजेच्या धक्क्याने मृत झालेल्या पाचही आदिवासींच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी जळगाव येथे करण्यात आल्यानंतर त्यांच्या मूळ गावी ओसरणी (ता. खकना, जि. बऱ्हाणपूर) येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्घटनेत बचावलेली एक वर्षाची दुर्गा हिस तिच्या आजोबांच्या स्वाधीन करण्यात आले. पाचही मृतदेहांचे फॉरेन्सिकचे नमुने पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.