---Advertisement---
Jalgaon News : जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांमध्ये बोगस शालार्थ आयडी तयार करून, शिक्षकांची बोगस भरती झाल्याप्रकरणी नाशिक येथे दाखल गुन्ह्यांच्या चौकशीसाठी सोमवारी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पाच जणांचे पथक जि.प. माध्यमिक शिक्षण विभागात दाखल झाले होते.
या पथकाने १० शिक्षण संस्थांमधील मुख्याध्यापकांची तब्बल ६ तास चौकशी करुन, काही कागदपत्रांची पडताळणी केली. याबाबत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी देखील दुजोरा दिला आहे. जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची बोगस भरती करत तेथील ४९ शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यात आले. तसेच दरमहा ५० हजार रुपये वेतन शासन तिजोरीतून देण्यात आले.
या प्रकरणी नाशिक येथे शिक्षण उपसंचालकांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर, या प्रकरणी एसआयटी देखील गठीत करण्यात आली होती. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सोमवार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता जि.प.च्या माध्यमिक विभागात दाखल झाले होते.
मुख्याध्यापक न गेल्याने पथक जळगावात
नाशिक मुख्याध्यापकांना बोलावले, ते गेले नाहीत म्हणून पथक जळगावात.. बोगास शालार्थ आयडी प्रकरणी पोलीसांनी संबधित शिक्षण संस्थांच्या चौकशीसाठी मुख्याध्यापकांना काही कागदपत्रांसह नाशिक येथे बोलावले होते. त्यासाठी २१ ते २३ ऑगस्टपर्यंतच्या तारखा देण्यात आल्या होत्या. मात्र, या दरम्यान, मुख्याध्यापक चौकशीला सामोरे न गेल्यामुळे सोमवारी, नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पाच जणांचे पथक जळगावात दाखल झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागात प्राथमिक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर, संबधित शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागात बोलावून, त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तब्बल सहा तास हे पथक शिक्षण विभागात थांबून होते. १० संस्थांच्या मुख्याध्यापकांना वेगवेगळे बोलावून घेत, त्यांची चौकशी केली. सायंकाळी ४.३० वाजता हे पथक परत झाले.
- शालार्थ आयडी प्रकरणाच्या काही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पाच जणांचे पथक सोमवारी माध्यमिक शिक्षण विभागात आले होते. १० शिक्षण संस्थांच्या मुख्याध्यापकांकडून त्यांनी काही माहिती जाणून घेतली. सहा तासांपर्यंत हे पथक जि.प. शिक्षण विभागात होते.
कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग