---Advertisement---
देश अस्थिर जागतिक परिस्थितीतून जात असताना गुंतवणूक चक्र तयार करण्यासाठी बँका आणि कार्पोरेट्सनी एकत्र यावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सोमवारी केले. वार्षिक बैंकिंग परिषदेतील फिबॅक-२०२५ च्या उद्घाटनपर
भाषणात संजय मल्होत्रा म्हणाले की, रिझर्व्ह बँक उदयोन्मुख क्षेत्रांसह बँक कर्ज वाढवण्यासाठी उपाययोजनांची पडताळणी करीत आहे. 
मी हे अधोरेखित करू इच्छितो की, आपण कदाचित विरुद्ध बाजूंनी आहोत असे वाटू शकते. नियमन केलेल्या संस्था विकासाला गती देण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि नियामक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करीत आहेत. परंतु, प्रत्यक्षात आपली उद्दिष्टे समान आहे. आपण एकाच संघात आहोत. आफल्याकडे विकसित भारताचे समान सामायिक दृष्टिकोन आहे, असे मल्होत्रा म्हणाले.
भारताच्या आर्थिक मध्यस्थीची कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी नियमन केलेल्या संस्थांसोबत एकत्र काम करण्यास आपण उत्सुक आहोत, जेणेकरून त्यांचे योग्य फायदे लोकांपर्यंत पोहोचतील. ज्या वेळी बँका आणि कॉर्पोरेट्सचे ताळेबंद त्यांच्या सर्वोत्तम स्थितीत असतात, तेव्हा त्यांनी एकत्र येऊन गुंतवणूक चक्र तयार करण्यासाठी चालना दिली पाहिजे. हे या टप्प्यावर खूप महत्त्वाचे आहे. रिझर्व्ह बँक वाढीचे उद्दिष्ट लक्षात घेऊन किंमत स्थिरतेच्या प्राथमिक उद्दिष्टासह चलनविषयक धोरण राबवत राहील, असे संजय मल्होत्रा यांनी सांगितले.









