---Advertisement---
जिल्ह्यात सलग दहा बारा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसामुळे जिल्ह्यातील १४ प्रकल्पापैकी ६ मध्यम प्रकल्पांनी शंभरी पार केली आहे. मोठया प्रकल्पापैकी गिरणा ९३.५५ टक्के ,वाघूर ८०.६६ टक्के तर हतनूर ४४.१६ टक्के जलसाठा झाला आहे. जिल्ह्यात मान्सूनच्या तिसऱ्या टप्प्यात बहुतांश प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या दोन दिवसापासून पावसाने उसंत घेतली असून गेल्या २४ तासात सर्वात जास्त १६ मिलीमीटर बहुळा तर त्याखालोखाल ११ मिलीमीटर हिवरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रासह अन्य परिसरात सरासरी ३७ मि.मी. पावसाची नोद झाली आहे. मोठया प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पात गेल्या २४ तासात ११९.३१ दशलक्ष घनमीटर अशी आवक झाली आहे. त्यानुसार हतनूर प्रकल्पाचे ६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून ३५ हजार १९१ क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील गिरणावर असलेल्या आठ प्रकल्पापैकी पाच मध्यम प्रकल्प पूर्ण भरले आहेत. या प्रकल्पातून होत असलेल्या ३९४६ क्यूसेक विसर्गामुळे प्रकल्पात ६.०४ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात पाऊस नसल्याने आवकेत घट झाली असून जलपातळी ९३ टक्क्यांवर पोचली आहे. अन्य लघू व मध्यम प्रकल्पापैकी अभोरा, मंगरूळ, सुकी, अंजनी, तोंडापूर आणि मन्याड प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून मन्याड मधून १०८३ क्यूसेक आणि अंजनी प्रकल्पाच्या २ दरवाजातून ७० क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे.
अन्य मध्यम प्रकल्पापैकी मोर ८४.०६, अग्नावती ३४.३६, हिवरा ६३.६५, बहुळा ७१.२३, गुळ ६६.१२, भोकरबारी २२.५७, बोरी ७५.७४ आणि शेळगाव ११.८५ असा सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पात ३६.९२ टिएमसीनुसार ६७.९८ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.