---Advertisement---
देशाचा नवा उपराष्ट्रपती निवडण्यासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. रालोआचे सी. पी. राधाकृष्णन् आणि इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात उपराष्ट्रपतिपदाची लढत होत आहे.
उपराष्ट्रपतिपदाच्यानिवडणुकीसाठी नवीन संसद भवनात सकाळी १० वाजतापासून मतदानाला प्रारंभ होणार असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. सायंकाळी ६ वाजता मतमोजणी होईल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. रालोआचे उमेदवार असलेले राधाकृष्णन् महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले बी. सुदर्शन रेड्डी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. या निवडणुकीत रालोआचे उमेदवार राधाकृष्णन् यांचा विजय निश्चित मानला जात आहे. किती मताधिक्याने ते विजयी होतील,
एवढाच फक्त मुद्दा आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या
निवडणुकीत लोकसभा तसेच राज्यसभेच्या खासदारांना मताधिकार असतो. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होत आहे. यासाठी कोणत्याच राजकीय पक्षाला व्हीप जारी करता येत नाही. मात्र, पक्षीय धोरणानुसार मतदार मतदान करीत असतात.
या निवडणुकीत मतदान कसे करायचे यासाठी रालोआ आणि इंडिया आघाडीने आपापल्या खासदारांसाठी एक कार्यशाळा घेतली होती.
लोकसभेच्या ५४३ खासदारांना मतदानाचा अधिकार आहे, मात्र लोकसभेची एक जागा रिक्त असल्यामुळे प्रत्यक्ष ५४२ खासदार मतदानाचा अधिकार बजावतील. राज्यसभेत २३३ निर्वाचित आणि १२ नामनियुक्त अशा २४५ खासदारांना मतदानाचा अधिकार आहे. मात्र, राज्यसभेत सात जागा रिक्त असल्यामुळे प्रत्यक्षात २३८ खासदारच मतदान करू शकतील. दोन्ही सभागृह मिळून ७८० खासदारांना मतदानाचा अधिकार असल्यामुळे विजयासाठी ३९१ मतांची आवश्यकता आहे. रालोआजवळ दोन्ही सभागृह मिळून ४२५ खासदार आहेत, त्यामुळे रालोआचे सी. पी. राधाकृष्णन् यांचा या निवडणुकीतील विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीचे संख्याबळ ३२४ आहे. जगदीप धनकड यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत आहे.
राधाकृष्णन् यांना वायएसआरचा पाठिंबा
वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी रालोआचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन् यांना पाठिंबा दिला आहे. वायएसआर काँग्रेसचे राज्यसभेत सात तर लोकसभेत ४ असे ११ खासदार आहेत. वायएसआर काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे रालोआचे संख्याबळ ४३६ झाले आहे. आपच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालिवाल रालोआच्या बाजूने मतदान करू शकतात. भारत राष्ट्र समितीने कोणालाही पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे भारत राष्ट्र समिती ऐनवेळी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.