---Advertisement---
Jalgaon News : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील दाखले देण्याची वेबसाइट सतत बंद पडत असल्यामुळे नागरिक आणि कर्मचारी दोघेही हैराण झाले आहेत. दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना सकाळी सात वाजल्यापासून महापालिकेत हजेरी लावावी लागत आहे. दररोज तीन ते चार तास सर्वर बंद राहत असल्यामुळे दाखले देण्याची प्रक्रिया ठप्प होत असल्याने नागरिक व कर्मचारी यांच्यात वाद होत आहे.
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातून दररोज सुमारे ४०० नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखले दिले जातात. मात्र गेल्या चार ते पाच
दिवसांपासून दररोज ही वेबसाइट बंद पडत असल्याने दिवसाला ४० ते ५० दाखले दिले जात आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी टोकन दिलेल्या नागरिकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहून देखील दाखले मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दीक वाद होत आहे.
वेबसाइट अपडेटचे काम
वारंवार वेबसाइट बंद पडत असल्याने जन्म-मृत्यू विभागाने माहिती घेतले असता वेबसाईड अपडेटची काम सुरू असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे सर्वर बंद पडत असल्याचे नागरिकांना सांगितले जात आहे.
ऑनलाइन सेवेचा वापरच नाही
महापालिकेच्या डिजिटल यंत्रणांवर नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी प्रशासनाने घरबसल्या दाखले व अन्य परवानग्या काढण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. मात्र, त्याकडे नागरिकांचे कल कमी दिसून येत असून जन्म-मृत्यू विभागात दाखले मिळविण्यासाठी गर्दी दररोज दिसून येत आहे.
सकाळी सात वाजता नागरिक मनपात
दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना एक ते दोन दिवस फ ऱ्या मारून देखील मिळत नसल्याने सकाळी सात वाजता नागरिक महापालिकेत नंबर लावण्यासाठी येत आहे.