---Advertisement---
यंदा विजयादशमीच्या पावन पर्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.४० वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित केलेल्या विजयादशमी उत्सवापासून शताब्दीचे कार्यक्रम सुरू होतील. त्यानंतर वर्षभर शताब्दी कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतभरातील वस्ती, नगर, मंडळ आदी प्रत्येक ठिकाणी १ लाखांवर हिंदू संमेलने होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या विजयादशमीपासून पुढील वर्षी विजयादशमीपर्यंत शताब्दी साजरी केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शताब्दी वर्षानिमित्त संघ स्वयंसेवक प्रत्येक वस्तीत गृह संपर्क अभियान राबविणार आहेत. यासाठी संघाने मागील तीन वर्षांपासून कार्यविस्तार योजना आखली आहे. या योजनेनुसार प्रत्येक वस्तीमध्ये संघ शाखा सुरू करण्यात संघाला यश येत असून देशभरात ८३ हजारांपेक्षा अधिक शाखा तर ३२ हजार साप्ताहिक मिलन सुरू असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. यासोबतच पंचपरिवर्तनावर भर दिला जाणार असून युवा वर्गासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. व्यक्ती निर्माणावर संघाचा भर आहे, असेही त्यांनी सांगितले.
नागपुरातील उत्सव हा मुख्य उत्सव असला तरी मणिपूरसह देशभरात विजयादशमी उत्सव साजरा होणार असल्याचेही ते
म्हणाले. बाल स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव २८ सप्टेंबर व ५ ऑक्टोबरला होणार असल्याचेही सुनील आंबेकर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.
देश-विदेशातील विशेष मान्यवरांची उपस्थिती
शताब्दी वर्षाच्या जनरल राणाप्रताप कलिका, विजयादशमी उत्सवाला लेफ्टनंट डेक्कन समूहाचे केमी कार्तिक व बजाज समूहाचे संजीव बजाज विशेष निमंत्रित आहेत. घाना, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इंडोनेशिया, थायलंड आदी देशांतून विशेष पाहुणे येणार आहेत. त्याचसोबत विदेशी माध्यमांचे प्रतिनिधीही विशेषत्वाने उपस्थित राहणार असल्याचे सुनील आंबेकर यांनी सांगितले.
सरसंघचालकांचे विशेष उद्बोधन; रामनाथ कोविंद प्रमुख अतिथी
रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात आयोजित शताब्दी वर्षाच्या विजयादशमी उत्सवाचे विशेष अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. अतिथींच्या भाषणानंतर शताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विशेष उद्बोधन होणार आहे. शस्त्रपूजन, प्रदक्षिणा संचलन, योग प्रात्यक्षिक, नियुद्ध, घोष प्रात्यक्षिकानंतर अतिथींचे भाषण व सरसंघचालकांचे उद्बोधन असा उत्सवाचा क्रम असणार आहे. २७ सप्टेंबरला कस्तुरचंद पार्क, यशवंत स्टेडियम, अमरावती मार्गावरील हॉकी मैदान या तीन ठिकाणांहून निघून व्हेरायटी चौकात पथसंचलनाने एकत्र येतील. तिथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत पथसंचलनाचे अवलोकन करणार आहेत.
---Advertisement---