---Advertisement---
चंद्रशेखर जोशी
पावसाळा यंदा मेपासूनच सुरू झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा पाऊस जास्तच असे सांगितले जात होते. सुरूवातीच्या काळातील परिस्थिती लक्षात घेता हा अंदाजही खराच ठरेल असे वाटत होते. मात्र नंतर पाऊस गायब झाला. जिल्ह्याचा विचार करता साडेसात लाख हेक्टर क्षेत्र खरीप लागवडी योग्य मानले जाते. जवळपास खरीप योग्य क्षेत्रात पीक लागवड झाली. मात्र पाऊस मध्येच गायब झाल्यामुळे यंदा कपाशीचा पेरा घटला. जवळपास साडेचार लाख हेक्टरात ही लागवड झालेली आहे. त्या तुलनेत मका, सोयाबीन लागवड जास्त झालेली आहे.
खरिपाचे उत्पादन हे शेतकऱ्याची दिवाळी कशी जाणार हे ठरवते. मात्र निसर्गाचा फेरा कधी काय फटका देईल सांगता येत नाही. यावेळी तिच प्रचिती आली आहे. आजच्या परिस्थितीत शेतातील परिस्थिती पहाता पाऊस थांबला असला तरी शेतांमध्ये पाणी साचलेले दिसते. एवढेच नव्हे तर अद्यापही अतिवृष्टीची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. परिणामी शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी थांबायला तयार नाही. ‘किती रे बाबा नुकसान करशील’ असेच वाक्य त्याच्या तोंडून बाहेर पडत आहे. मध्यंतरीच्या पावसामुळे पिके वाढली… आता तर डोलू लागली होती पण दैवाचा फेरा सारे काही घेऊन गेल्याची दृश्य शेतांमध्ये पहायला मिळते आहे.
शेतातील परिस्थिती पहाता यंदाची दिवाळी जोरात होणार हेच समाधान त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. मेमध्ये झालेल्या पावसानंतर तर तो अधिकच खूश होता. अनेकांनी सोसायटीचे कर्ज घेतले… काहींनी पत्नीच्या अंगावरील सोने विकले आणि पेरणी आटोपली… या आठवड्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीच्या फेऱ्याने ‘होत्याचे नव्हते’ केले. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव तर पूर्वेकडील रावेर, मुक्ताईनगर, यावलचा काही भागातील शेती पीक अक्षरशः वाहून गेले. अनेक भागात अद्यापही शेतांमध्ये पाणी साचलेले दृश्य दिसत आहे. काही ठिकाणी पिकांसह जमीन वाहून गेलेली दिसत आहे.
शेतात काही लावले होते की नाही, असे दृश्य पहायला मिळाले… सायंकाळी शेतात पिकांकडे डोळे भरून ज्या शेतकऱ्याने पाहिले त्याच्या शेतातील पीक दुसऱ्या दिवशी दिसेनासे झाल्याचे पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर त्याच्या घामाने भिजलेला प्रत्येक दिवस उभा राहिला. कर्ज काढून घेतलेले बियाणे, खत, रासायनिक खते सर्व काही वाहून गेलेले तो उघड्या डोळ्यानी पाहून मेहनतीचे फळ नष्ट झाल्याची हुरहूर त्याच्या छातीत पेट घेऊन उठली. शेतातील बांध वाहून गेले अन् अश्रुंचे बांध थांबता थांबत नसल्याचे दृश्य गावागावात दिसत आहे. शेतात हिरव्यागार डोलणाऱ्या पिकांमुळे जे स्वप्न कुटुंबाला दाखविले जात होते ते उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्याच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा आता सुरू झाला आहे.
शासनाकडून मदत दिली जाईल, विमा कंपन्यांकडून मदत होईल पण या सर्व गोष्टींना मर्यादा आहे. जे थोडेफार हाती येईल… त्याला भाव कमी मिळेल कारण सततच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणच्या कापसाचा वा धान्याचा दर्जा खालावला जाईल. शासन पातळीवर या पावसाळी स्थितीचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. शेतकरी अतिशय अडचणीत आला आहे. राजकारणी या प्रश्नावर जागे झाले आहेत.
आपण पूर्वी काय बोंब पाडली याचाही मंडळी विचार करत नाहीत. त्यांचे राजकारण त्यांच्या जागी पण शासनानेही बांधावर शेतात फिरून केवळ स्थितीची पहाणी करून उपयोग नाही. तत्काळ मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय या शासनाने यापूर्वी घेतले आहेत पण ऐन सणांच्या काळातही आपत्ती आली आहे, याचा गांभीर्यान विचार केला जावा व जनतेचे सरकार हीच भावना कायम कशी राहील याचा विचार केला जाणे आवश्यक आहे.
---Advertisement---