---Advertisement---
भारतातील प्राचीन आयुर्वेदिक ज्ञान आता शाळा आणि महाविद्यालयांमधील आरोग्य शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केले जाईल. एनसीईआरटी आणि यूजीसी संयुक्तपणे शालेय आणि उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम मॉड्युल विकसित करीत आहेत, अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
यामुळे नवीन पिढी आरोग्याच्या प्राचीन भारतीय ज्ञानाशी जोडली जाईल. गोवा, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश यासारख्या काही राज्यांनी आधीच शालेय शिक्षणात भारतीय ज्ञान प्रणालींचा समावेश केला आहे. मंत्रालय पुराव्यावर आधारित संशोधनावर लक्ष केंद्रित करीत आहे, असे जाधव यांनी सांगितले. ‘सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस’ (सीसीआरएएस) आणि इतर संस्थांद्वारे उच्च दर्जाच्या क्लिनिकल चाचण्या घेतल्या जात आहेत.
आयुर्वेदिक उपचारांची वैज्ञानिक वैधता अधिक मजबूत करण्यासाठी डब्ल्यूएचओच्या सहकायनि मानके विकसित केली जात आहेत. आधुनिक औषधोपचार, म्हणजेच ॲलोपॅथी आणि आयुष औषधोपचार पद्धती एकमेकांना पुरक आहेत, स्पर्धात्मक नाहीत. राष्ट्रीय आयुष मिशन आणि आयुष ग्रीडच्या माध्यमातून, दोन्ही प्रणालींचे फायदे एकत्रित करून चांगली आरोग्यसेवा प्रदान करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
पुढील सत्रापासून बदल शक्य
नवीन मॉड्युल कधी तयार होईल आणि अभ्यासक्रमात कधी समाविष्ट होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. तथापि, पुढील शैक्षणिक सत्रापासून शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आयुर्वेदाचे ज्ञान समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे.
---Advertisement---