समाज सहयोगातून संघाची शताब्दी यात्रा सुकर

---Advertisement---

 

दत्तात्रेय होसबळे ( रा. स्व. संघाचे सरकार्यवाह )

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभर वर्षांच्या प्रवासात अनेकांनी साथ दिली, सहकार्य केले आणि सक्रिय सहभागही घेतला. हा प्रवास खडतर होता, अनेक संकटे आली; पण सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा हीच सर्वांत मोठी आणि सुखद गोष्ट होती. शताब्दी वर्षाचा विचार करताना अशा अनेक आठवणी आणि लोकांचे स्मरण होते, ज्यांनी हा प्रवास यशस्वी करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.

संघाच्या सुरुवातीच्या काळात, तरुण कार्यकर्ते एका योद्ध्याप्रमाणे देशप्रेमाने भारलेले होऊन संघ कार्यासाठी देशभर निघाले. आप्पाजी जोशींसारखे संसार सांभाळणारे गृहस्थ कार्यकर्ते असोत किंवा दादाराव परमार्थ, बाळासाहेब आणि भाऊराव देवरस बंधू, यादवराव जोशी, एकनाथ रानडे यांसारखे प्रचारक असोत. या सर्वांनी डॉ. हेडगेवारांच्या मार्गदर्शनाखाली संघकार्याला राष्ट्रसेवेचे व्रत मानून आयुष्यभर ते चालू ठेवले.

संघाचे कार्य नेहमीच समाजाच्या पाठिंब्यावर पुढे सरकत गेले. सामान्य जनतेच्या भावनांशी जुळणारे असल्यामुळे, – समाजातील त्याची स्वीकारार्हता हळूहळू वाढत गेली. एकदा स्वामी विवेकानंदांना परदेशात कोणीतरी विचारले होते की, “भारतात बहुतांश लोक निरक्षर असताना, तुमच्या विद्वत्तापूर्ण गोष्टी त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील?” तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते की, “ज्याप्रमाणे मुंग्यांना साखर कुठे आहे? हे शोधण्यासाठी इंग्रजी शिकण्याची गरज नसते, त्याचप्रमाणे भारतातील लोक आपल्या आध्यात्मिक ज्ञानामुळे कुठलेही चांगले कार्य लगेच ओळखतात आणि त्यात आपला सहभाग नोंदवतात.” हीच गोष्ट संघाच्या सात्त्विक कार्यालाही अनुभवायला मिळाली; ज्याला सामान्य जनतेकडून सातत्याने पाठिंबा मिळत गेला.

संघाचे कार्य सुरू झाल्यापासूनच अनेक सामान्य कुटुंबांनी संघ कार्यकर्त्यांना आशीर्वाद आणि आधार दिला. स्वयंसेवकांची कुटुंबे हीच संघकार्याची केंद्रे राहिली. सर्व माता-भगिनींच्या सहकायनि (मातृशक्तीमुळे) संघकार्याला पूर्णत्व मिळाले. दत्तोपंत ठेंगडी. यशवंतराव केळकर, बाळासाहेब देशपांडे, एकनाथ रानडे, दीनदयाल उपाध्याय किंवा दादासाहेब आपटे यांसारख्या लोकांनी संघाच्या प्रेरणेने समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये अनेक संघटना उभ्या करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व संघटना आजही आपापल्या क्षेत्रात मोठे काम करत आहेत आणि सकारात्मक बदल घडवत आहेत. समाजातील भगिनींसाठी राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून वंदनीय मावशी केळकर आणि प्रमिलाताई मेढे यांच्यासारख्या मातृसमान व्यक्तींचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे.

संघाने वेळोवेळी राष्ट्रीय हिताचे अनेक विषय उचलून धरले, तेव्हा त्याला समाजातील विविध लोकांचे समर्थन मिळाले, यात अनेकदा सार्वजनिक स्तरावर विरोधी असणारे लोकही सामील होते. राष्ट्राची एकात्मता, सुरक्षा, सामाजिक सलोखा, लोकशाही आणि धर्म-संस्कृती यांच्या रक्षणाच्या कार्यात असंख्य स्वयंसेवकांनी खूप कष्ट सोसले आणि शेकडो लोकांनी बलिदानही दिले. या सर्व वेळी समाजाचा आधार संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

१९८१ मध्ये तामिळनाडूच्या मीनाक्षीपुरम्मध्ये झालेल्या धर्मांतराच्या महत्त्वपूर्ण विषयावर हिंदू जनजागरण करण्यासाठी आयोजित केलेल्या सुमारे पाच लाख लोकांच्या संमेलनाचे अध्यक्षपद तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. कर्णसिंह यांनी भूषवले होते. १९६४ मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत स्वामी चिन्मयानंद, मास्टर तारा सिंह, जैन मुनी सुशील कुमारजी, बौद्ध भिक्खू कुशोक बकुला आणि शीख सद्‌गुरू जगजीत सिंह यांचा प्रमुख सहभाग होता. हिंदू धर्मात अस्पृश्यतेला स्थान नाही हे सिद्ध करण्यासाठी श्रीगुरुजी गोळवलकर यांच्या पुढाकाराने उडुपी येथे झालेल्या संमेलनात सर्व संतांनी आशीर्वाद दिला.

या संमेलनाची घोषणा होती ‘हिंदवः सोदराः सर्वे’ (सर्व हिंदू भारत मातेचे पुत्र आहेत). गोहत्याबंदी असो वा रामजन्मभूमी अभियान, संतांचे आशीर्वाद संघाला नेहमीच मिळत राहिले आहेत. स्वातंत्र्यानंतर लगेचच राजकीय कारणांमुळे सरकारने संघ कार्यावर प्रतिबंध लादला, तेव्हाही सामान्य लोक आणि अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती संघाच्या बाजूने उभ्या राहिल्या. आणिबाणीच्या संकटातही असाच अनुभव आला. म्हणूनच इतके अडथळे येऊनही संघाचे कार्य अविरतपणे पुढे वाढत आहे. या सर्व परिस्थितीत माता-भगिनींनी संघकार्य आणि स्वयंसेवकांना मोठ्या कौशल्याने सांभाळले. या सर्व गोष्टी संघ कार्यासाठी नेहमीच प्रेरणास्रोत ठरल्या आहेत.

राष्ट्राच्या सेवेत समाजातील सर्व लोकांचे सहकार्य आणि सहभाग मिळावा यासाठी, संघ स्वयंसेवक शताब्दी वर्षात घरोघरी संपर्क साधून विशेष प्रयत्न करतील. देशातील मोठ्या शहरांपासून ते अगदी दुर्गम गावांपर्यंत आणि समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचणे हे प्रमुख लक्ष्य राहील. समाजातील सर्व सज्जन शक्तीच्या एकत्रित प्रयत्नांतून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची पुढील वाटचाल सुकर आणि यशस्वी होईल.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---