---Advertisement---
Muktainagar News: राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुक्ताईनगर उपखंडाचा विजयादशमी उत्सव संपन्न झाला. संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे. परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे. मातृभूमीला परम वैभवसंपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे. संघाच्या पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचे आहे असे, वक्तव्य उत्सवाचे प्रमुख वक्ते व जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख अमोल खलसे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. भाऊराव महाराज पाटील तर माननीय तालुका संघचालक डॉ मनोज महाजन उपस्थित होते. उत्सवाची सुरुवात स्वयंसेवकांच्या पंथसंचलनाने करण्यात आली. सुरुवातीस पारंपारिक शस्त्रांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले, त्यानंतर शाखेतील स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले.
उत्सवातील प्रमुख वक्ते अमोल खलसे पुढे म्हणाले, पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली ती भारताला पुन्हा परम वैभवसंपन्न करण्यासाठी हिंदू समाज आपले स्वत्व विसरल्यामुळे परकीय आक्रमकांनी आपले अतोनात नुकसान केले. इस्लामिक आक्रमकांनी हिंदू अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी येथील पूर्ण समाजात भेद निर्माण करून आपापसात भांडण लावण्याचे कारस्थान रचले. त्यामुळे पुन्हा आपला समाज गुलामगिरीत जाणार नाही आणि परस्परात एकता व समरसता राहील यासाठी संघाने मागील 100 वर्ष विविध प्रकारे कार्य केले. येणारा काळ अनेक आव्हानांनी भरलेला आहे. त्यासाठी समाजात एकजूट राहणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी संघाने सांगितलेली नागरिक कर्तव्य, कुटुंब प्रबोधन,पर्यावरण, समरसता, स्वदेशी हे पंच परिवर्तन आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच शताब्दी वर्षानिमित्त समस्त हिंदूं समाजास संघटित करण्यासाठी हिंदू मेळावे,गृहसंपर्क अभियान यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. त्यासाठी आपल्याला कटिबध्द व्हायचे आहे. संघकार्य हे ईश्वरीय कार्य आहे. यामध्ये स्वयंसेकांसोबत त्याचे परिवार, समाजातील सज्जनशक्ती, माता भगिनी अनेकांचे योगदान राहिले आहे, असे ते म्हणाले.
यावेळी मोठ्या संख्येने उपखंडातील गणवेशधारी स्वंयसेवक व महिला,नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका संघचालक डॉ. मनोज महाजन यांनी तर सूत्रसंचालन तालुका सहकार्यवाह राजेश पाटील यांनी केले.