---Advertisement---
Pachora News : पाचोरा तालुक्यातील भातखंडे रेल्वे भुयारी मार्गात पाणी सचले आहे. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाखाली पाणी साचत आहे. पाणी साचलेले असल्याने या मार्गातून मार्गक्रम करतांना वाहनधारकांसह पादचीरी ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे.
पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द गावाजवळ गेट नंबर 133 रेल्वे भुयारी मार्ग असून भातखंडे खुर्द नवेगाव, व जुने गाव येथील नागरिक, शालेय विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, व्यापारी वर्ग, नोकरवर्ग, ज्येष्ठ नागरिक, तसेच भातखंडे खुर्द गावाला लागूनच खेड्यापाड्यातील नागरिक सदर रेल्वे भुयारी मार्गातूनच ये- जा करीत असतात. या रेल्वे भुयारी मार्गात सतत पाणी साचत असल्याने मोरी कमकुवत होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच या पूलावरुन रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर रेल्वे गाड्या धावत असतात.
पावसाळ्यात समस्या होते बिकट
या पुलाखाली पाणी साचण्याची समस्या गंभीर आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व अतिवृष्टीमुळे, मुसळधार पावसामुळे सदरच्या रेल्वे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे भातखंडे खुर्द नवेगाव, जुने गाव व भातखंडे खुर्द गावाला लागून खेड्यापाड्यातील सर्व नागरिकांचे हाल होतांना दिसून येत आहे. दुसरा पर्यायी मार्ग फेऱ्याचा असल्यामुळे सदर गावातील नागरिक याच भुयारी मार्गातुन वावरत असतात. त्यात ही समस्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
या साचलेल्या पाण्याच्या निचरा करण्यासाठी मशीन बसवले असुन मशीन कधी चालू ते कधी बंद अवस्थेत आढळून येत असते, त्यामुळे समस्या सुटण्यापेक्षा त्यात अधिक भर पडत आहे. रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचणार नाही, या संबंधीत अधिकारी ठेकेदार यांनी तत्काळ याकडे लक्ष देवून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.









