---Advertisement---
जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर पाकिस्तानने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे, असे खडे बोल भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सुनावले होते. त्यावर भारताशी पुन्हा युद्ध झाल्यास भयंकर विनाश होईल आणि आम्ही माघार घेणार नाही अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिली.
मुनीर यांनी निवेदनात म्हटले की, भारतीय संरक्षण मंत्री आणि सैन्य प्रमुखांकडून येणारी चिथावणीखोर विधाने पाहता भविष्यात कुठलाही संघर्ष झाला तर, तो खूप विनाशकारी असू शकतो. जर शत्रुत्वाचा नवा काळ सुरू झाल्यास पाकिस्तान मागे हटणार नाही. आम्ही कुठलीही पर्वा न करता जोरदार प्रत्युत्तर देऊ.
नवीन नियम बनवण्याचा विचार करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, पाकिस्तानने आता एक नवीन पद्धत स्वीकारली आहे. ही पद्धत जलद, निर्णायक आणि विनाशकारी असेल. अनावश्यक धमक्या आणि कुठल्याही हल्ल्यांना तोंड देताना पाकिस्तानचे सशस्त्र दल लढण्याची क्षमता आणि दृढनिश्चय बाळगतात. यावेळी आम्ही भारतीय भूभागाच्या सर्वांत दुर्गम कोपऱ्यात पोहोचू.