---Advertisement---
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ‘आम्ही भारताचे लोक’ असा उल्लेख केला आहे. यातून एक भारत, श्रेष्ठ भारत हा भाव निर्माण झाला पाहिजे. देशाची सर्वतोपरी प्रगती होत आहे. ‘स्व’चा सन्मान, स्वाभिमान न घालवता काम केले पाहिजे. जगातील सर्व देश आपापल्या बळावर उभे राहिले पाहिजे.
इंग्रजी मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे. जागृत संघटित शक्ती देशाचे भाग्य निश्चित करणार आहे. सर्व सत्ता आपल्याच ताब्यात हे भारताचे कधीच स्वप्न नव्हते. जगाला मार्गदर्शन करणारा देश आम्हाला हवा आहे. भारत विश्वगुरू होणे ही नियती आहे, ते होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय निमंत्रित सदस्य भय्याजी जोशी यांनी केले.
रा. स्व. संघ वर्धा नगराच्या आज स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित विजयादशमी उत्सवात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून वर्धेतील प्रसिद्ध आकार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश चन्नावार होते तर व्यासपीठावर जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांची उपस्थिती होती.
भय्याजी जोशी म्हणाले की, भारत सामर्थ्यसंपन्न करायचा असेल, तर आत्मसंरक्षण अतिशय आवश्यक आहे. भारताने काही जीवनमूल्ये दिली आहेत. त्या जीवनमूल्यांचे रक्षण समाजाने करायचे आहे. भारताचा इतिहास सामर्थ्याचा आहे. येथे सकारात्मक दृष्टी आहे. सामाजिक जीवनात १०० वर्षे फार कमीही नाहीत आणि जास्तही नाहीत.
१०० वर्षे अनुभव खूप आहेत. परंतु, परिणाम म्हणून कमी आहे. ब्रह्मांडाची रचना चक्राकार आहे. चक्र गतिमान होते. उत्थान आणि पतन हे निसर्गाचे काम आहे. पतनाच्या टोकावर गेल्यावर ज्याच्याकडे आंतरिक शक्ती आहे, त्याचेच उत्थान होते. भारताची शक्ती मोठी आहे. जगाला देणारा भारत उभा होत आहे. आमचा भारत श्रेष्ठ भारत म्हणून उभा होतो आहे.
संकुचित भाव दूर केला पाहिजे. स्पृश्य-अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. देशाबद्दल समाजातील अज्ञान दूर होण्याची आवश्यकता आहे. आपण मानसिक गुलामीत आहोत. इंग्रज गेले पण आपण इंग्रजी मानसिकतेतून बाहेर निघालो नाही. ती जेवढ्या लवकर जाईल तेवढे चांगले. इंग्रजीशिवाय चालत नाही, असे होऊ नये. चीन, जापान, रशिया इंग्रजी बोलत नाही. त्यांची गाडी कुठे अडली नाही, असे ते म्हणाले.