---Advertisement---
भुसावळ : येथील नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून प्रशासनाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी,प्रभाग रचना आणि आरक्षणाची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीवर नागरिकांना हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली असून, मतदार यादी व प्रभाग आरक्षणावर हरकती सादर करण्यासाठी १३ व १४ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.ही यादी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रभाग आरक्षणावर दोन व्यक्तींकडून तीन हरकती दाखल झाल्या आहेत, तर मतदार यादीवर एक हरकत दाखल झाली आहे.
यंदाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक प्रभागांमध्ये मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आले असून काही मतदारांची नावे संबंधित यादीतून वगळली गेली असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी मतदार यादीवर हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरकतींची सुनावणी झाल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. तसेच ७ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रभाग आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकतींवर विभागीय आयुक्तांकडून सुनावणी घेण्यात येणार असून, त्यानंतर २४ ऑक्टोबर पर्यंत अंतिम आरक्षण यादी मंजूर होईल आणि २८ ऑक्टोबर रोजी ती राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.
निवडणुकीसंदर्भातील बहुतेक प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार असून, नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर महिन्यात मतदान प्रक्रिया पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेची तयारी प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.