छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त

---Advertisement---

 

बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाने माओवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त करीत बॅरेल ग्रेनेड लाँचरसाठी (बीजीएल) लागणारे मोठ्या प्रमाणातील साहित्य जप्त केले, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.

या वर्षी एप्रिल ते मे या कालावधीत छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेंगुटा पहाडी भागात सुरक्षा दलाने २१ दिवस मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या कारवाईत झालेल्या वेगवेगळ्या चकमकींत ३१ माओवादी ठार झाले होते. जवळपास ३५ अग्निशस्त्रे आणि ४५० आयईडी जप्त करण्यात आले होते.

कोब्रा बटालियनसह विविध बटालियनच्या जवानांचा समावेश असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दल अर्थात् सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने सोमवारी करेंगुटा डोंगरांच्या पायथ्याशी शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत पथकाला मोठ्या प्रमाणावर स्फोटके आणि बीजीएल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

सुरक्षा दलाने बीजीएलचे ५१ जिवंत गोळे, एचटी ॲल्युमिनियम वायरचे १०० बंडल, मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वायर, स्टीलचे ५० पाईप्स, लोखंडाचे २० पत्रे आणि बीजीएल तयार करण्यासाठी आवश्यक ४० लोखंडी प्लेट्स जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आयईडी शोधून टाळला अनर्थ

सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी माओवाद्यांनी पेरलेले पाच प्रेशर आयईडी बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने शोधून सुरक्षा दलाने ते नष्ट केले. या माध्यमातून मोठा अनर्थ टाळला. या यशस्वी कारवाईतून माओवाद्यांची मोठा घातपात घडवण्याची योजना सुरक्षा दलाने उधळली आणि मोहीम पूर्ण केल्यावर सर्व सुरक्षा कर्मचारी सुरक्षितपणे तळावर परतले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---