शिवसेना शिंदे गट भाजपाला खिंडीत गाठणार, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वबळाचे नारे

---Advertisement---

 

चेतन साखरे

जळगाव : जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. गत काळातील अनुभव लक्षात घेता महायुतीतील मित्र पक्ष असलेला शिंदे गट जळगाव जिल्ह्यात भाजपाला खिंडीत गाठण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे ज्याठिकाणी भाजप ताकदवान आहे तिथे मित्रपक्षांना दुरच ठेवणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात युतीची माती आणि आघाडीची बिघाडी अशा समिकरणांचा इतिहास कायम राहिला आहे. लोकसभा आणि विधानसभेला भारतीय जनता पार्टी मित्रपक्षांना गोंजारून यश गाठत असते. मात्र स्थानिक निवडणुका आल्या की ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ याप्रमाणे मित्रपक्षांसोबत राजकीय व्यवहार करीत असते. भाजपाच्या या वागणुकीची मित्र पक्षांकडून अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त करून इशारे-प्रतिइशारे दिले जातात.

भाजपाच्या ‘बघू, करू, होईल’ मुळे सावध भूमिका

लोकसभा विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीची वेळ आली की भारतीय जनता पार्टीचा सूर ‘बघू, करू, होईल’ असा राहीला आहे. गत महापालिका निवडणुकीवेळी भाजपाने शिवसेनेला अखेरपर्यंत झुलवत ठेऊन एकट्याच्या बळावर निवडणूक लढून मनपाची सत्ता ताब्यात घेतली होती. असाच प्रयोग यावेळेलाही भाजपाकडून होईल, असा अंदाज लावत मित्रपक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.


शिंदे गट भाजपला आव्हान देणार

जळगाव जिल्ह्यात नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचीही मोठी ताकद आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा, चोपडा आणि पाचोरा-भडगाव या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे
आमदार मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे यंदाच्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाला विरोधकांपेक्षा शिंदे गटच आव्हान देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यात कुठेही महायुती म्हणून निवडणुका लढविल्या गेल्या तरी जळगाव जिल्ह्यात मात्र शिंदे गट भाजपाला खिंडीत गाठणार आहे.

पारोळ्यात थेट मुलाखतींना सुरूवात

पारोळा-एरंडोल मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी तर आघाडी घेत थेट ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरूवात केली आहे. त्यामुळे भाजपाला विचारात न घेता शिवसेनेचे आमदार अमोल पाटील यांनीही ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

  • पाचोरा-भडगाव मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका शिवसेना पक्ष स्वबळावरच लढविणार आहे. कारण वैशाली सूर्यवंशी, प्रताप हरी पाटील, दिलीप वाघ, अमोल शिंदे हे जे लोक भाजपात आहेत यांनी माझ्याविरूध्द निवडणूक लढविली असून भाजपाने त्यांना रसद पुरविली. त्यामुळे त्यांच्याशी युती करणार कशी? तसेच ह्या निवडणुका कार्यकत्याँच्या असल्याने आम्ही कार्यकर्त्यांच्याच पाठीशी उभे राहू. मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे, जिथे जशी परीस्थिती असेल तशी निवडणूक होईल.
    किशोर पाटील, आमदार, शिवसेना.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---