---Advertisement---
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण, जेव्हा देशातील लक्झरी ट्रेनमध्येही असेच घडत आहे, तेव्हा काय करायचे असा प्रश्न पडतो. अमृत भारत एक्सप्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.
ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या पॅकेटचे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये टाकून दिलेल्या डिस्पोजेबल प्लेट्स आणि उरलेले अन्न दिसत आहेत. प्रवाशांचा दावा आहे की, त्यांना पुन्हा वापरल्या जाणाऱ्या प्लेट्सवर जेवण देण्यात आले होते. हे फोटो समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहेत. अमृत भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसोबत किळसवाणा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
ट्रेनमध्ये जेवण देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल प्लेट्स आणि बॉक्स धुऊन पुन्हा वापरल्या जात आहेत. प्रवाशांचे म्हणणे आहे की, त्यांना जुन्या पदार्थांचे आणि तेलाचे डाग असलेल्या बॉक्समध्ये जेवण देण्यात आले होते. कोणीतरी याचे फोटो समाज माध्यमांवर टाकले, जे आता वेगाने व्हायरल होत आहेत. काही जणांनी यावर टीका करीत लिहिले की, रेल्वेने आता शाश्वत विकासात पुढाकार घेतला आहे, कारण प्लेट्स आता फेकल्या जात नाहीत तर, धुतल्या जातात आणि पुन्हा वापरल्या जातात.
प्रकरण वाढताच, रेल्वेने केटरिंग एजन्सीकडून रिपोर्ट मागवला आणि चौकशी सुरू केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील विनय यादव नावाच्या अकाउंटवरून शेअर केलेले हे फोटो अनेकांनी पाहिले आहेत. रेल्वेने सार्वजनिक आरोग्याशी तडजोड केल्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.