माओवादाचा अंत जवळ, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, नक्षलमुक्त जिल्ह्यांमध्ये धूमधडाक्यात दिवाळी

---Advertisement---

 

भारत माओवादी दहशतवादाचे उच्चाटन करण्याच्या मार्गावर आहे आणि या संकटातून मुक्त झालेले १०० पेक्षा जास्त जिल्हे यावर्षी दिवाळी सन्मानाने साजरी करीत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. आयएनएस विक्रांत नौकेवर सशस्त्र दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते.

सरकारने माओवादी दहशतवादाविरुद्ध महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे आणि त्यांचा प्रभाव दशकापूर्वीच्या १२५ जिल्ह्यांवरून केवळ ११ जिल्ह्यांपर्यंत आला आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलांच्या पराक्रम आणि धैर्यामुळे मागील काही वर्षांत आपण महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. माओवादी दहशतवादाचे उच्चाटन करण्याबाबत हा टप्पा आहे. देश माओवादी दहशतवादापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

जवळपास २०१४ पूर्वी देशभरातील १२५ जिल्हे माओवाद्यांच्या हिंसाचाराच्या विळख्यात होते आणि मागील दशकात सरकारने उचललेल्या कठोर पावलांमुळे ही संख्या घटून केवळ ११ जिल्हयांवर आली आहे. या ११ जिल्ह्यांपैकी केवळ तीन जिल्हेच खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रभावाखाली आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

माओवादी दहशतीतून मुक्त झालेले १०० जिल्हे आता प्रथमच मुक्तपणे श्वास घेत असून, ते भव्य दिवाळी साजरी करीत आहेत. काही प्रदेश असे होते, जिथे माओवाद्यांनी शाळा, रस्ते आणि रुग्णालये उभारू दिले नाहीत. त्यांनी शाळा आणि रुग्णालये उडवली आणि डॉक्टरांना गोळ्या घातल्या. आता याच प्रदेशांमध्ये महामार्ग उभारले जात आहेत, नवीन व्यवसाय सुरू होत आहेत, मुलांच्या नवीन भविष्यासाठी शाळा आणि रुग्णालये उभारली जात आहेत. हे यश केवळ सुरक्षा दलाच्या जवानांच्या त्याग आणि धाडसामुळे मिळाले आहे. पहिल्यांदाच देशातील अशा अनेक जिल्ह्यांमधील लोक अभिमानाने, सन्मानाने दिवाळी साजरी करणार असल्याचा मला आनंद असल्याचे मोदी म्हणाले.

सैन्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे पाकिस्तान गुडघ्यावर

सैन्याच्या तीनही दलांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे ‘ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान गुडघ्यावर आला, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आयएनएस विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही तर, ती एकविसाव्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा आणि वचनबद्धतेची साक्ष आहे. आयएनएस विक्रांत भारताच्या सशस्त्र दलांच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे आणि ते ‘आत्मनिर्भर भारत’चे एक उत्तुंग प्रतीक आहे, असे मोदी म्हणाले.

यंदाची दिवाळी आयएनएस विक्रांतवर

नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर नौसैनिकांसोबत साजरी करणार आहेत मोदी रविवारी सायंकाळी गोव्यात पोहोचले आणि गोव्याच्या किनाऱ्यावर असलेल्या आयएनएस विक्रांतवर पोहोचले. आयएनएस विक्रांतवर असताना नरेंद्र मोदी फ्लाईटडेकवर गेले. फ्लाईटडेक मिग-२९ विमानांनी वेढलेले होते. दिवसा आणि रात्रीच्या अंधारातही त्यांनी विमानवाह् जहाजाच्या धावपट्टीवर मिग-२९ विमानाच्या उड्डाण आणि उतरण्याचा अनुभव घेतला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---