Raver News: पोलीस कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा! सापडलेले दिड लाखाचे मंगळसूत्र केले परत

---Advertisement---

 

Raver News:  रावेर परिसरातून एक सुखद घटना समोर आली आहे. कर्तव्यावर तैनात असलेल्या एका पोलीस  कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. या कर्मचाऱ्याला सुमारे दीड लाख रुपयाचे मंगळसूत्र सापडले होते. पोलिसांनी तपास करून हे मंगळसुत्र त्याच्या मुळ मालकाला सुपुर्त केले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल येथील मजुरी करणाऱ्या महिलेचे हे मंगळसुत्र असून तिला ते परत करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

    याबाबत माहिती अशी की, नरवेल येथील सखुबाई प्रमोद धनगर या भाऊबीजेसाठी कांडवेल येथे जाणार होत्या. मात्र त्यांच्या दोन बहिणी शोभा सावळे अहिरवाडी व रूपाली सावळे यांनी रावेर बस स्थानकावर दुपारी बारापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. यानंतर ते रावेर शहरात भाऊबीजेसाठी कपडे खरेदी करण्यासाठी येथील बस स्टॅन्ड वरून शहरात येण्यासाठी निघाल्या. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर व खरेदी करणाऱ्या महिला व पुरुषांची गर्दी पाहून अहिरवाडी येथील बहिणीने आपले मंगळसूत्र चोरीला जाऊ नये म्हणून पर्समध्ये ठेवले. तर सखुबाई धनगर यांनी सदर मंगळसूत्र काढून सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील महालक्ष्मी मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उजव्या बाजूच्या कोपऱ्यात पडले. दरम्यान सदर महिलेने आपली मंगळसूत्र गहाळ झाल्याचे आपल्या बहिणींना सांगितले. यामुळे ही महिला रडू लागली. यानंतर ते कांडवेल येथे निघून गेले. दरम्यान, आंबेडकर चौकातील वाहतूक पोलीस कर्मचारी गफार तडवी यांना ते मंगळसूत्र सापडले.

कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस गफ्फार तडवी,  रुबाब तडवी व होमगार्ड राहूल कासार यांनी मंगळसूत्र सापडल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना सांगितले. सदर घटना गुरुवार २३ रोजी दुपारी साडे बाराचे सुमारास घडली होती. यानंतर वाहतूक पोलीस कर्मचारी गफ्फार तडवी, रुबाब तडवी, होमगार्ड राहुल कासार यांनी शोध मोहिम राबवून आज दुपारी नरवेल येथील सखुबाई धनगर या महिलेस पोलीस ठाण्यात बोलवून सदर मंगळसूत्राची शहनिशा करून व तिचेच असल्याची खात्री करून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे हस्ते मंगळसुत्र या महिलेच्या स्वाधीन करण्यात आले.  मंगळसूत्र हातात मिळताच या महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पोलिसांच्या या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---