---Advertisement---
नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सैन्य दलाकडून येत्या ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या काळात पश्चिम सीमेवर संयुक्त युद्ध सराव करण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा सराव असेल. भारतीय लष्कर, नौदल आणि वायूसेना यांच्या संयुक्त मोहिमेला त्रिशूल युद्धाभ्यास, असे नाव देण्यात आले आहे.
भारतीय सैन्यदलाच्या युद्ध अभ्यासाच्या धास्तीने पाकिस्तानने त्यांच्या मध्य आणि दक्षिण हवाई क्षेत्रात अनेक हवाई वाहतूक मार्ग बंद करण्याची घोषणा केली आहे. ही बंदी २८ ते २९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू असेल. भारताने त्रिशूल युद्ध अभ्यासासाठी नोटीस टू एअरमेन अर्थात् नोटम जारी केले आहे.
३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर काळात पश्चिम सीमेवर होणाऱ्या त्रिशूल सरावात तिन्ही सैन्य सहभागी होतील. त्रिशूल सरावात दक्षिण कमांडचे सैन्य महत्त्वाची भूमिका बजावेल. ते आव्हानात्मक सर क्रीक खाडी प्रदेश आणि पश्चिम सीमेवरील वाळवंटातील प्रदेशासह विविध ठिकाणी संयुक्त अभ्यास करतील.
याशिवाय भारतीय सैन्य सौराष्ट्र किनाऱ्यावरील समुद्रातदेखील अभ्यास करणार आहे. या सरावादरम्यान गुप्तचर, पाळत ठेवणे आणि देखरेख ठेवणे याचाही सराव केला जाईल. त्याचप्रमाणे सायबर युद्धाच्या आव्हानांशी संबंधित सराव देखील आयोजित केले जातील. विशेष म्हणजे या युद्ध सरावात आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शस्त्रांचीही क्षमता तपासली जाईल.
राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर १२ दिवस चालणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव आहे. थारच्या वाळवंटात लष्कर, वायुसेना आणि नौदलाचे ३०,००० सैनिक संयुक्त सराव करतील. ऑपरेशन सिंदूरमध्येही स्वदेशी शस्त्रांनी शत्रूला घाम फोडला होता हे विशेष.
पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी
कोणत्याही संभाव्य आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई दल आणि नौदलालाही सज्ज ठेवण्यात आले आहे. बहावलपूर स्ट्राइक कॉर्म्स आणि कराची कॉप्सची विशेष तयारीसाठी निवड करण्यात आली आहे. शोरकोट, बहावलपूर, रहीम यार खान, जेकबाबाद, ‘भोलारी आणि कराची सारखी विमानतळे देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, अरबी समुद्रात गस्त आणि नौदल क्रियाकलाप वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.









