---Advertisement---
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. सत्तेसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी हातमिळवणी केली असून, महायुतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांनी एकत्र येऊन निवडणुकीचा रणसंग्राम लढण्याचा निर्णय घेतला आहे.
नगराध्यक्ष पदासाठीसुद्धा या तिन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू असून, काही ठिकाणी त्याचे स्वरूप निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या युतीनंतर पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
अनेक वर्षे पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना आता ‘आयाराम-गयाराम’ प्रकारच्या नवागतांना प्राधान्य मिळत असल्याने असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नाराज इच्छुकांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत दिले असून, काही बंडखोर मिळून स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारी करत आहेत.
काहींनी तर स्पष्टपणे “आम्ही अन्याय सहन करणार नाही” असे सांगत युतीच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे ; महायुती विरुद्ध बंडखोरांचा पॅनल?
आगामी काही दिवसांत नशिराबादच्या राजकारणात नेमके कोण कुणाच्या बाजूने उभे राहते, हे पाहणे निश्चितच उत्सुकतेचे ठरणार आहे.









