---Advertisement---
जम्मू- काश्मीरमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर आणि दहशतवादी नेटवर्कविरोधात पोलिस, सुरक्षा दल आणि राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने संयुक्त कारवाई करीत १२० पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली. छाप्यांमध्ये मोबाईल फोन, सिम कार्ड, डिजिटल उपकरणे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान आणि व्याप्त काश्मिरातून भारताच्या विरोधात कुरघोडी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या संपर्कात काही लोक असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून बडगाम, कुलगाम आणि शोपियाँसारख्या दुर्गम भागात शनिवारी रात्री संयुक्त कारवाई करण्यात आली. त्यात एनआयए आणि सुरक्षा दलाचे पथकही सहभागी होते.
गंदरबालमध्ये ६० पेक्षा जास्त घरांची झडती घेण्यात आली. ही घरे तुरुंगातील दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या नातेवाईकांची होती. कारवाईत जप्त करण्यात आलेली उपकरणे न्यायवैद्यक परीक्षण आणि त्यातील माहिती काढण्यासाठी पाठवली जातील. या माध्यमातून दहशतवादी केवळ संपर्कात होते अथवा भरती, आश्रय दिला, हे स्पष्ट होईल.
चौकशीसाठी ९० जण ताब्यात
छापेमारीनंतर ९० जणांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्या समाज माध्यम खात्याची आणि बँक व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे. येत्या काही दिवसांत आणखी कारवाई केली जाणार आहे.









