नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई, ३२ लाखांचे २१५ मोबाइल मूळ मालकांना केले परत!

---Advertisement---

 

नंदुरबार : जिल्हा पोलीस दलाने मोठी कामगिरी करत नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल २१५ मोबाइल संच हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. हस्तगत केलेल्या मोबाइल संचांची एकूण किंमत ३२ लाख सात हजार ८९६ रुपये आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या हस्ते सोमवारी (१७ नोव्हेंबर) हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून गहाळ झालेल्या विविध कंपन्यांच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. या शोधमोहिमेत सीईआयआर पोर्टलचा उपयोग करून मोबाइल ट्रॅकिंगसाठी आयएमईआय क्रमांकाचा वापर करण्यात आला. सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तरीत्या काम करत ही मोहीम यशस्वी केली. कारवाईत गहाळ झालेले मोबाईल केवळ नंदुरबार जिल्ह्यातूनच नव्हे; तर जिल्ह्याबाहेरूनही हस्तगत करण्यात आले आहेत.

सोमवारी (१७ नोव्हेंबर) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉलमध्ये गहाळ झालेल्या मोबाइलच्या मूळ मालकांना त्यांचे संच परत करण्याचा कार्यक्रम झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या हस्ते मालकांना त्यांचे मोबाइल देण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.

या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी, मोबाइल हरवल्यास तत्काळ सीईआयआर पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करावी. तसेच मोबाईलचा आयएमईआय क्रमांक जपून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून हरवलेला मोबाइल लवकर शोधण्यास मदत होईल, असे आवाहन नागरिकांना केले. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---