---Advertisement---
नंदुरबार : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट येथील नगरपालिका निवडणुकीत आमने-सामने असून, भाजपचे उमेदवार अविनाश माळी आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी यांच्यातच नगराध्यक्षपदासाठी मुख्य लढत रंगणार आहे. मात्र, रघुवंशी यांचा गड भाजप भेदणार का? याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
येथील नगरपालिका निवडणुकीत चुरशीत होणार आहे. निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित यांची, तर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रघुवंशी हे तब्येतीची पर्वा न करता पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत. दोन्ही नेते महायुतीच्या सत्तेत असले, तरी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी ते दोघांच्या विरोधात उभे आहेत.
नंदुरबारला नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार फारुखखान जहीरखान कुरेशी, भाजपचे अविनाश महादू माळी, शिवसेना ठाकरे गटाच्या संगीता खंडू माळी व शिवसेना शिंदे गटाच्या रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांच्यात चौरंगी लढत होत आहे. आता चिन्हवाटप झाल्यानंतर आता प्रचाराचा धुराळा उडणार आहे. प्रत्येक प्रभागात कॉर्नर सभा घेऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणुकीत तीन वर्षे प्रशासक असल्यामुळे शहरात विकास करू शकलो नाही, असे प्रशासनावर खापर फोडण्याचे काम राजकीय पक्षातील नेते करत आहेत. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासकामांवर मत मागितले जात आहे. तसेच पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी गटारीच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची शहाद्यात, तर शिवसेना शिंदे गटातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घांचे पुत्र व शिवसेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नंदुरबारमध्ये जाहीर सभा झाली. त्यामुळे नंदुरबारमध्ये राज्यातील नेत्यांचे दौरे होत असून, त्यामुळे पालिका निवडणुकांत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. राज्यात महायुतीची सत्ता असताना, स्थानिक पातळीवर मात्र बेबनाव आहे.
बुधवारी (२६ नोव्हेंबर) निवडणूक आखाड्यातील नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदा १०५ उमेदवारांना राजकीय पक्षांसह अपक्षांचे चिन्ह वाटप करण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी भाजप, दोन्ही शिवसेना, अपक्ष अशा चौघांचा समावेश आहे. तसेच २० प्रभागांतील ४१ जागांसाठी १०१ उमेदवार रिंगणात आहेत.
यात भाजपचे ४९, शिवसेना शिंदे गटाचे ४९, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहा, एआयएमआयएमचे सहा, वंचित बहुजन आघाडीचा एक आणि चार अपक्षांना विविध चिन्हे वाटप करण्यात आली. पालिका इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थितीत चिन्ह वाटप प्रक्रिया पार पडली.
जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या चार नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व सदस्यपदांच्या निवडणूक रिंगणातीत ४१२ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील चारही पालिका मिळून नगराध्यक्षपदासाठी १९ आणि सदस्यपदांसाठी ३९३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.









