---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या सभांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापलेल्या वातावरणात विरोधक तर दूरच राहिले असून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर, भुसावळ पालिकांमध्ये ‘कॉटे की टक्कर’ असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
जिल्ह्यातील १६ नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींसाठी उद्या २ डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. पालिकांच्या निवडणुका ह्या जिल्हा परिषदेची रंगीत तालीम मानल्या जात आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. नगरपालिका झाल्या की, जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. ह्या निवडणुका जरी ग्रामीण भागाच्या असत्या तरी शहरी राजकारणाचा त्यावर प्रभाव राहीला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘स्वबळाचा’ पायंडा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेत युती निश्वीत होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आत्या की, युतीधर्म हा बाजूला ठेऊन स्वबळाचे नारे दिले जातात. जळगाव जिल्ह्यातही आत्तापर्यंतच्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेने नेहमीच स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या आहेत. अशा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेतच खरा सामना होत आला आहे. यावेळच्याही निवडणुकीत हीच परीस्थिती कायम राहिली आहे.
महाविकास आघाडी कोमात, महायुतीत लढत
राज्यात महाविकास आघाडीविरूध्द महायुती असे चित्र असले तरी स्थानिक स्तरावर मात्र राजकीय गणिते बिघडलेलीच आहेत. पालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कोमात असून महायुतीतील मित्र पक्षांमध्येच ‘काँटे की टक्कर’ होत आहे.
फडणवीस, शिंदेंच्या सभा गाजल्या
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील भाजप उमेदवारांसाठी भुसावळ येथे जंगी सभा घेत मित्रपक्षांसह विरोधकांना अप्रत्यक्षरित्या राजकीय इशारे दिले. या इशाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखीत जिल्ह्यात तीन ठिकाणी सभा घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंदेच्या पाचोरा आणि मुक्ताईनगर येथे झालेल्या सभांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. महायुतीतील शीतयुध्द या सभांच्या निमित्ताने पुढे आले आहे. दरम्यान जिल्ह्यात ताकद कुणाची ? याचा फैसला बुधवारी ३ डिसेंबरला मतमोजणी अंती स्पष्ट होणार आहे.









