---Advertisement---
मासेरू : दक्षिण आफ्रिके जवळील लेसोथो देशात असलेल्या काओ खाणीत एक भव्य आणि दुर्मिळ गुलाबी हिरा सापडला आहे. आंतरराष्ट्रीय रत्नशास्त्रीय संस्थेच्या अहवालानुसार, लिलावात या हिऱ्याची किंमत कोट्यवधी डॉलर्स जाण्याची शक्यता आहे. या सापडलेल्या हिऱ्याचे वजन १०८.३९ कॅरेट आहे.
काओ खाणीतील एकाच खडबडीत दगडातून अनेक मौल्यवान हिरे मिळू शकतात, असे तज्ञांचे मत आहे. हा हिरा टाईप एलएलए श्रेणीतील आहे. नायट्रोजनमुक्त आणि कोणतीही रासायनिक अशुद्धता नसलेला हा हिरा नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या सर्वात शुद्ध हिन्ऱ्यांपैकी एक असल्याचे मानले जाते. या हिन्ऱ्याची गुलाबी छटा अत्यंत तीव्र आणि आकर्षक आहे. यामुळे संग्रहक आणि गुंतवणूकदार यांच्यात या हिऱ्याची मोठी मागणी आहे. इतर हिन्ऱ्यांमध्ये रंग रासायनिक अशुद्धतेमुळे येतो, मात्र गुलाबी हिऱ्यांचा रंग त्यांच्या अंतर्गत स्फटिक रचनेत (इंटरनल क्रिस्टल स्ट्रक्चर) झालेल्या बदलांमुळे येतो. पृथ्वीच्या खोलवर अति उष्णता आणि दाबामुळे हिऱ्याच्या रचनेत विकृती (स्ट्रक्चरल डिफॉरमेशन) निर्माण होतात. यामुळे हिऱ्याला हा गुलाबी रंग मिळतो.
या विकृतींमुळे गुलाबी हिरे अत्यंत मौल्यवान असतात. लेसोथो या लहान देशासाठी हिरा उद्योग हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. काओ खाण विशेषतः दुर्मिळ रंगीत हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या एकाच उच्च-मूल्याच्या हिऱ्याच्या विक्रीतून देशाला मोठे राष्ट्रीय महसूल मिळण्याची शक्यता आहे. यामुळे देशाच्या आर्थिक स्थिरतेवर सकारात्मक परिणाम होईल.









