---Advertisement---
नंदुरबार : उपनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील धानोरा येथे तरुणास मारहाण करीत दुखापत केल्या प्रकरणात दोघांना गुन्हा सिद्ध झाल्याने येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली.
काय आहे प्रकरण?
उपनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील शेतमजूर लताबाई नरपत वळवी (वय ४८, रा. पाटील गल्ली, धानोरा, ता. जि. नंदुरबार) यांचा मुलगा अनिल नरपत वळवी यास धानोरा गावातील कमानीजवळ हरीश नेहरू वळवी व दिनेश केशवंत वसावे (दोन्ही रा. शांतीनगर, धानोरा, ता. जि. नंदुरबार) यांनी काही कारणास्तव मारहाण केली. लताबाई व सून सुनीता अनिल वळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. हरीश वळवी हा दगडाने, तर दिनेश वळवी हा अनिलच्या डोक्यावर वार करत होता. त्या वेळी लताबाई व सून सुनीता येत असल्याचे पाहून दोघांनी पळ काढला होता. त्यानंतर लताबाई व सुनीता वळवी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी अनिल नरपत वळवी यास रुग्णालयात दाखल केले होते. ही घटना दुचाकी चालविण्याच्या वादातून झात्याबाबतची फिर्याद लताबाई वळवी यांना झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात १३ ऑगस्ट २०२२ रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवणे यांनी गुन्ह्याच्या तपासात हरीश वळवी व दिनेश वसावे यांना वेळीच अटक करून गुन्ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही संशयितांविरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले होते.
खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्यासमोर झाली. खटल्यात सरकारपक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपासाधिकाऱ्यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. यावरून सबळ पुराव्याच्या आधारे हरीश वळवी (वय २४) व दिनेश वसावे (वय २५) यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी दोषी ठरवीत प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
खटल्याचे कामकाज सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. महेश पाडवी यांनी पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक हेमंत मोहिते, पैरवी अंमलदार हवालदार नितीन साबळे, राजेंद्र गावित, शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहिले. तपासाधिकारी तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन व जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी यांनी गौरव केला.









