---Advertisement---
Nashirabad Municipal Council Election Results 2025 : नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीचा निकाल रविवारी ( दि. २१ डिसेंबर) सकाळी ठीक १० वाजता जाहीर होण्यास सुरुवात होणार असून, दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निवडणुकीत ८४ नगरसेवक पदांसह ६ नगराध्यक्ष उमेदवारांचे भवितव्य ठरणार असल्याने, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीसाठी ४ फेऱ्या, ९ टेबल्स लावण्यात आले असून, या प्रक्रियेला पार पाडण्यासाठी टेबलवर ३६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संपूर्ण प्रक्रियेसाठी १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच माध्यमांसाठी स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात येणार असून निकाल क्षणाक्षणाला प्रसिद्ध केला जाणार आहे.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नशिराबादमध्ये यावेळी नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपरिषद इमारतीवर फडकणार आणि नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नशिराबादच्या राजकीय इतिहासात नवे पर्व सुरू होणार की सत्तेची पुनरावृत्ती होणार, याचा फैसला अवघ्या काही तासांत होणार आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून निकाल प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उद्या सकाळी नशिराबादचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.









