---Advertisement---
बंगळुरू : गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूलचा वेग कमी करणारी ड्रोग पॅराशूटची चाचणी इस्रोने यशस्वी केली. या चाचण्या १८ आणि १९ डिसेंबर रोजी चंडीगडमधील टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळेच्या अर्थात् टीबीआरएल युनिटमध्ये घेण्यात आल्या होत्या.
क्रू मॉड्यूलच्या माध्यमातून अवकाशवीरांना पृथ्वीवर आणले जाते. यासाठी विशिष्ट पॅराशूट लागतात. गगननयानच्या मोहिमेत चार प्रकारचे १० पॅराशूट आहेत. या चाचण्यांमुळे यानाच्या विविध उड्डाण परिस्थितींमध्ये ड्रोग पॅराशूट्सची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध झाली असून, मानवी अंतराळ प्रवासातील ही एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
इस्रोच्या मते, यानाचा वेग कमी करण्याची मालिका पॅराशूट चेंबरमधून संरक्षक कव्हर काढून टाकण्यापासून सुरू होते. त्यानंतर दोन ड्रोग पॅराशूट सज्ज केले जातात. तीन पायलट हे पॅराशूट उघडतात. हे मुख्य पॅराशूट क्रू मॉड्यूलची गती आणखी कमी करतात, ज्यामुळे पृथ्वीवर क्रू मॉडेलचे सुरक्षित लैंडिंग होते. इस्रोने या संदर्भातील माहिती एक्सवर प्रसिद्ध केली आहे.









