---Advertisement---
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने समाज माध्यमाच्या वापराबाबत आपल्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. नव्या निर्देशांनुसार आता लष्करातील जवान आणि अधिकारी इंस्टाग्रामचा वापर केवळ पाहणी आणि निरीक्षणापुरताच करू शकणार आहेत. ते कोणतीही पोस्ट टाकू शकणार नाहीत, तसेच कोणत्याही पोस्टला लाईक किंवा त्यावर टिप्पणी करण्याचीही त्यांना मुभा नसेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, डिजिटल व्यवहारांबाबत आधीपासून लागू असलेले इतर सर्व नियम कायम राहणार असून हे नवे आदेश सेनेच्या सर्व युनिट्स आणि विभागांना जारी करण्यात आले आहेत.
या धोरणामागील उद्देश असा आहे की जवानांनी समाज माध्यमांवर फिरणारी माहिती पाहावी, त्याबाबत जागरूक राहावे आणि खोटी, दिशाभूल करणारी किंवा संशयास्पद सामग्री ओळखता यावी. अशा प्रकारची कोणतीही पोस्ट आढळल्यास ती त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याची मुभा जवानांना देण्यात आली आहे. यामुळे माहिती युद्ध आणि दुष्प्रचाराविरोधात सेनेची अंतर्गत सतर्कता अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. भारतीय सेना यापूर्वीही फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या वापरावर वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करत आली आहे.
‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्याची भीती
सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वी या माध्यमांवर कडक निर्बंध घालण्यात आले होते. काही प्रकरणांमध्ये परदेशी गुप्तचर यंत्रणांनी रचलेल्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून काही जवानांकडून नकळत संवेदनशील माहिती लीक झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.









