---Advertisement---
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी योगेश पाटील उर्फ पिंटू शेठ यांनी आज, सोमवारी ( दि. २९) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , परमपूज्य श्री झिपरु अण्णा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांनुसार नशिराबाद शहराचा सर्वांगीण, समावेशक व शाश्वत विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिल्ह्याचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचा कारभार पारदर्शक व नागरिकाभिमुख पद्धतीने चालविला जाईल. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी विकासाच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे मत नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी व्यक्त केले.
नशिराबादकरांना पालकमंत्र्यांची ग्वाही
नगरपरिषदेचा कारभार लोकाभिमुख, पारदर्शक व सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन चालविला तर शहराचा विकास निश्चितच आदर्श ठरेल. यापूर्वीही शहरासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही, भविष्यातही शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. शिवसेना–भाजपा युतीच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
निवड प्रमाणपत्रांचे वितरण
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना निवड प्रमाणपत्रांचे औपचारिक वितरण करण्यात आले. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी एकदिलाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये नवचैतन्य
या कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेवक कोमल प्रशांत नारखेडे, पंकज श्यामकांत महाजन, लीना पंकज महाजन, मनोज चंद्रकांत पाटील, हिना बी. मो. रईस कासार, सय्यद वासीफ अली, शाह हनीफा बी मोहम्मद खलील, शेख असलमोद्दिन एजाजोद्दीन, शैला कैलास व्यवहारे, कीर्तीकांत पंडित चौबे, सुवर्णा सचिन महाजन, लालचंद प्रभाकर पाटील, जनाबाई भगवान रंधे, चेतन दगडू बऱ्हाटे, शेख नसरीन बानो, मोहम्मद इक्बाल शेख, कमरूनिसा सय्यद, आसीफ शेख, भारताबाई विकास धनगर, विकास गणपत पाटील यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, शिवसेना शहराध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच शिवसेना–भाजपा युतीचे तालुका व शहर पदाधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक पंकज महाजन यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जि. प. चे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील यांनी आभार मानले.









