---Advertisement---
जळगाव : जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. अशात आणखी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जिल्हयात किमान तापमानाचा पारा ९ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. नवीन वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक असताना राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.
उत्तरेकडील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. राज्यभर थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गारठा अधिक वाढत आहेत.
आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार १ जानेवारीपासून तापमानाचा पारा पुन्हा घसरणार आहे. दि.१ जानेवारी रोजी किमान तापमान १२ अंश तर कमाल २८ अंश सेल्सिअसवर जाणार आहे.
दि.२ जानेवारी रोजी पुन्हा दोन अंश सेल्सिअसने हा पारा घसरणार आहे. त्यामुळे किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर येणार आहे. तर दि. ३ जानेवारी रोजी २ अंशांवर पारा जाणार असल्याने हाडे गोठवणारी थंडी निर्माण होणार आहे.
येत्या ७ दिवसांत राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, नवीन वर्षात नागरिकांना गारठा जाणवू शकतो, असा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणामध्ये १ जानेवारीपर्यंत दाट धुक्याचा इशारा दिला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.








