नंदुरबारच्या ‌‘लाल मिरची‌’चा ठसका; परंपरेतून घडलेली ओळख! प्रक्रिया उद्योगांकडे शासनाकडून चालना देण्याची आवश्यकता तंत्रज्ञान, योजनांमधून अधिक सक्षम ‌‘क्लस्टर‌’ होण्यास मदत

---Advertisement---

 

दीपक महाले, सायसिंग पाडवी
नंदुरबारच्या लाल मिरचीचा ठसका आज केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो जिल्ह्याची स्वतंत्र ओळख बनला आहे. झणझणीत तिखटपणा, आकर्षक लाल रंग आणि दीर्घकाळ टिकणारी चव यांमुळे या मिरचीने राज्यातच नव्हे; तर देशभर आपली छाप पाडली आहे. अनेक पिढ्यांपासून शेतकऱ्यांनी जपलेले पारंपरिक बियाणे, स्थानिक हवामानाशी सुसंगत लागवड आणि कष्टाची शेती यांमुळे नंदुरबारची लाल मिरची वेगळी ठरते. ही मिरची म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा, आत्मसन्मानाचा आणि सातत्याचे प्रतीक आहे. अलीकडे मिळालेल्या ‌‘भौगोलिक मानांकना‌’मुळे नंदुरबारच्या लाल मिरचीचा ठसका अधिक ठळक झाला असून, नंदुरबारकरांच्या कष्टाला आणि गुणवत्तेला अधिकृत मान्यता मिळाली आहे. मात्र, शासनाने विविध प्रकारच्या मिरची उत्पादनासह त्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्याकडे लक्ष देण्याची गरज उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.

नंदुरबार हा नर्मदा व तापी या नद्यांच्या खोऱ्यात वसलेला उत्तर महाराष्ट्रातला महत्त्वाचा जिल्हा. सातपुड्याची डोंगराळ रांग, बेसाल्ट खडकाच्या विघटनातून तयार झालेली बारीक चिकणमाती आणि सुपीक माती शेतीसाठी उपयुक्त मानली जाते. विशेषतः ज्वारी, बाजरी व मिरची यांसारख्या पिकांसाठी ही जमीन वरदान समजली जाते. लाल मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा या तालुक्यांत मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. लाल मिरचीला ‌‘भौगोलिक मानांकन‌’ मिळाले असल्याने नंदुरबारच्या लाल मिरचीचा ‌‘ठसका‌’ देशभर पसरला आहे.

मिरची हे महत्त्वाचे मसाले पीक असून मिरचीचे ‌‘भारतीय करी‌’ पावडर परदेशात लोकप्रिय झाले आहे. भारतीय मिरचीला देश-विदेशातून चांगली मागणी असते. महाराष्ट्रात नंदुरबार, चंद्रपूर, नागपूर, जालना, नाशिक, लातूर, धाराशिव, सोलापूर आदी जिल्ह्यात मिरचीची मोठ्या प्रमाणात मागणी असते. अलीकडेच नागपूरच्या ‌‘भवापूर मिरची‌’ला आणि नंदुरबारच्या ‌‘लाल मिरची‌’ला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या मिरचीला विशिष्ट तिखटपणा, रंग, चव असून बाजारपेठेत मागणी वाढली आहे.

‌‘लाल मिरचीचे आगार‌’ म्हणून नंदुरबारची ओळख

जनजातीबहुल असलेल्या नंदूरबार जिल्ह्याची ओळख आता ‌‘लाल मिरचीचे आगार‌’ म्हणून झाली आहे. नंदुरबार, शहादा व तळोदा आदी तालुक्यात तीनशेहून अधिक वर्षांपासून मिरची उत्पादन घेतले जाते. सुमारे 3500 हेक्टर क्षेत्रात शेतकरी मिरचीची लागवड करतात. नंदुरबार तालुक्यातील कोठली, लहान शहादे, खोंडामळी, सुजालपूर व शहादा तालुक्यातील कुठावद, धुरखेडा, म्हसावद आणि तळोदा तालुक्यातील प्रतापपूर, रांझणी, बोरद आदी गावातील शेतकऱ्यांनी अनेक पिढ्यांपासून मिरचीचे पारंपरिक बियाणे टिकवून ठेवले आहे. त्यामुळे तिची चव आणि गुणवत्ता आजही टिकून आहे.

नंदुरबारच्या लाल मिरचीची वैशिष्ट्ये

नंदुरबारची लाल मिरची इतर मिरच्यांपेक्षा अनेक बाबतींत वेगळी आहे. ही मिरची तिखट असून, तिच्यामध्ये ‌’कॅप्सॅसिन‌’ नावाचे रसायन आहे. त्यामुळे अन्नाची चव वाढते. सुकवलेल्या मिरच्यांमध्ये सुगंध टिकून राहतो. नैसर्गिकरीत्या मिळालेला गडद लाल रंग मसाल्यांना आकर्षक बनवतो. मिरचीची पाने अंडाकृती असतात. पोटॅशियम 332 मिलिग्रॅम, कार्बोहायड्रेट प्रति 9 ग्रॅम, प्रथिने 1.9 ग्रॅम आणि लांबी 9 ते 11 सेंटिमीटर असते. ही मिरची योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास आठ ते दहा महिने खराब होत नाही. मिरचीचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होऊन मार्च-एप्रिलपर्यंत असतो. विशेषतः नंदुरबारमधील हवामान मिरचीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे शेतकरी पावसाळा आणि हिवाळा या दोन हंगामांत मिरचीची लागवड करतात. हिरव्या मिरचीचा पहिला तोडा 50 दिवसांनी होतो. लाल मिरचीचे तीन ते चार तोडे होतात.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ

नंदुरबार जिल्हा लाल मिरची उत्पादनासाठी देशभरात विशेष ओळख आहे. देशातील मिरचीची दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. शेजारील गुजरात व मध्य प्रदेशातून मिरचीची मोठी आवक होत असते. मध्य प्रदेशातून मोठी आवक होते. सध्या रोज 3 ते 4 हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे. आवक असूनही दर कायम आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये 4 लाख 25 हजार क्विंटल मिरचीची विक्रमी आवक झाली होती. बाजार समितीत 70 हून अधिक मिरची व्यापारी आहेत. हे व्यापारी शेतकऱ्यांकडून ओली लाल मिरची खरेदी करतात. नंतर ती वाळवून देशातील विविध बाजारपेठांत पाठवितात.

लाल मिरचीला प्रतवारीनुसार मिळतो दर

नंदुरबार बाजार समितीत मिरची आवक सुरू झाली आहे. सध्या 25 ते 26 व्यापारी माल खरेदी करण्यासाठी उपलब्ध असल्याने आवक वाढूनही बाजार समितीत मिरचीचे दर स्थिर आहेत. येथील बाजारपेठेत दिवसाकाठी तीन हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे, तर लाल मिरचीला प्रतवारीनुसार अडीच ते दोन हजार 600 हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. गुणवत्तेनुसार दरात चढ-उतार होत असले तरी इतर बाजारपेठांच्या तुलनेत येथे भाव समाधानकारक असतात. सध्या व्हीएनआर, जरेला, फापडा आदी प्रकारच्या मिरचीची बाजारपेठेत आवक होत आहे. सुमारे अडीच ते तीन हजार क्विंटल मिरची बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. परराज्यातील व्यापारीही मिरची खरेदी करीत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याने किमान तेवढा भाव मिळत आहे, अन्यथा पाचशे ते हजार रुपये क्विंटल मिरचीचे मातीमोल दर शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी मिळाले होते. त्यात खर्चही निघाला नव्हता. आता आवक सुरू झाल्याने येथील बाजारपेठेत लाल गालिचा अंथरल्यागत दिसून येत आहे. दरम्यान, दरवर्षीपेक्षा यंदा आवक कमी होणार असल्याचा अंदाज आहे.

मिरची प्रक्रिया उद्योगात दबदबा

नंदुरबारसह तालुक्यात लहान-मोठे मिरची प्रक्रिया उद्योग आहेत. शहरासह जिल्ह्यात मिरचीवर 70 ते 80 प्रक्रिया उद्योगांची नोंदणी आहे. शिवाय, घरगुती व शेतकरी स्तरावरही छोटे-मोठे प्रक्रिया उद्योग उभे राहत आहेत. त्यामुळे मिरची उद्योग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ बनला आहे. ‌‘राजकमल ब्रँड‌’, ‌‘महादेव मसाले‌’, ‌‘तुलसी मसाले‌’, ‌‘राजा छाप‌’, ‌‘अन्नपूर्णा‌’, ‌‘जय योगेश्वर‌‘, ‌‘स्वादानंद‌’, ‌‘दर्शन मसाले‌’ यांसारखे नामांकित उद्योग मिरचीवर प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करीत आहेत. याशिवाय, जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून मिरची लागवड, प्रक्रिया आणि विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. नंदुरबार येथील मिरचीची ख्याती सातासमुद्रापार गेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचीचे उत्पादन जिल्ह्यात घेतले जाते. गुजरात सीमेवरील शेतकरीही येथे मिरची विक्रीसाठी आणतात. स्थानिक मिरची उत्पादनामुळे खासगी मिरची प्रक्रिया उद्योगही मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत.

डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका

नंदुरबार मिरचीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी तसेच मिरची लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी डॉ. हेडगेवार सेवा समिती व कृषी विज्ञान केंद्राने मोलाची भूमिका बजावली आहे. काही काळ बदलते हवामान, दुष्काळ आणि रोगराईमुळे मिरची लागवडीवर परिणाम झाला होता. परिणामी शेतकरी मिरचीऐवजी कापूस व इतर नगदी पिकांकडे वळले होते, त्यामुळे लाल मिरचीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी या संस्थांच्या वतीने शेतकऱ्यांना संघटित करून आधुनिक पद्धतीने मिरची लागवडीस प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात मिरची लागवड क्षेत्रात पुन्हा वाढ होण्यास मदत झाली.

भौगोलिक मानांकन अन्‌‍ फायदे

नंदुरबारच्या मिरचीची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण व्हावी यासाठी नाबार्डच्या पुढाकाराने भौगोलिक मानांकनाचा प्रस्ताव सादर केला.
उत्पादन पद्धती, हवामानाचा परिणाम यासंदर्भात शास्त्रीय व भौगोलिक माहिती संकलनात या दोन संस्थांनी पुढाकार घेतला. तपासणी व परीक्षणानंतर चेन्नई येथील भौगोलिक मानांकन रजिस्ट्री कार्यालयाद्वारे नंदुरबार मिरचीला 30 मार्च 2024 रोजी भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाले. यामुळे ‌‘नंदुरबार मिरची‌’ हा एक अधिकृत ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

मिरची उत्पादकांची सरकारकडून अपेक्षा

जिल्ह्यात मिरची उत्पादनाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‌‘मिरची क्लस्टर‌’ निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना मिरची लागवड प्रक्रिया व विक्रीचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शिवाय, मिरची वाळविण्यासाठी वाळवणी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. निर्यातीसाठी अपेडा संस्थेचे मार्गदर्शन केंद्र व निर्यात सुविधा उपलब्ध व्हाव्यात. तसेच सद्यःस्थितीत ठिकठिकाणी मिरची शेतांमध्ये वाळविण्यासाठी पसरततात. त्यासाठी शेतमालकांना भाडेही द्यावे लागते. त्यासाठी सरकारने एमआयडीसीप्रमाणेच मिरची उत्पादकांना पथारीसाठी तसेच साठवणुकीसाठी जागांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. शिवाय, रोपेनिर्मिती नर्सरीतून केली जाते. त्यासाठी नेटवर्किंग होण्याची गरज आहे. नंदुरबारच्या या वैशिष्ट्यपूर्ण पिकांना केंद्र व राज्य सरकारने आर्थिक पाठबळ दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती निश्चितच वेगाने साध्य होऊ शकेल.

निसर्गाच्या लहरीपणामुळे क्षेत्र घटले!

बदलत्या नैसर्गिक वातावरणाचा परिणाम सर्वच पिकांवर होत आहे. यामधून भाजीपाल्याचीही सुटका झाली नाही. गेल्या पाच वर्षांपासून उत्पादनात घट होत असल्याने आता मिरचीचे मुख्य आगार समजल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्येही मिरची लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. नैसर्गिक असमतोलामुळे कमी झालेले पर्जन्यमान असो की उत्पादनाच्या तुलनेत होणारा खर्च हे सर्व पाहता मिरचीचे उत्पादन शेतकऱ्यांना परवडत नाही. यामुळे गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना मिरची उत्पादनात मोठा फटका बसला आहे. 50 एकरवर मिरचीचे उत्पादन घेणारे शेतकरी आता केवळ एक ते वीस एकरवर आले आहेत. उत्पादनात शेतकऱ्यांनी आता बदल केला असून, मिरचीऐवजी ऊस, केळी, पपई या नगदी पिकांकडे शेतकरी वळले आहेत. त्यामुळे कधीकाळी रोज 30 हजार क्विंटल मिरचीची होणारी आवक आता थेट तीन हजार क्विंटलवर आली आहे.

नंदुरबारच्या मिरचीची ठळक वैशिष्ट्ये

नंदुरबारमध्ये लाल मिरचीची मोठी बाजारपेठ असून, विविध भागांतून येथे मिरची येते. नंदुरबारमध्ये लाल मिरचीला चांगला दर मिळतो, जो सुमारे 2810 रुपये प्रतिक्विंटल किंवा त्याहून अधिक असू शकतो. हिवाळ्याच्या हंगामात नोव्हेंबर-डिसेंबर ओल्या लाल मिरचीची आवक नंदुरबार बाजार समितीत वाढते. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात मिरचीची लागवड केली जाते आणि बाजारपेठेत मिरचीची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते.

मानवी आहारात मिरचीचे स्थान

मिरची हे भारतातील महत्त्वाचे आणि मूल्यवान पीक आहे. विविध प्रकारचे लोणचे, भाज्या, मसाले, सॉस आणि चटणी यामध्ये मिरचीचा महत्त्वाचा वाटा असतो. महाराष्ट्र हे मिरची उत्पादनातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे आणि येथे विविध प्रकारांच्या मिरच्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रात एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र मिरचीचे आहे. मिरचीचे पीक सर्वाधिक धुळे, जळगाव, नंदुरबार, नागपूर, अमरावती, पुणे, चंद्रपूर, उस्मानाबाद आणि छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी घेतले जाते. भारतातील प्रमुख मिरची उत्पादक राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिसा, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांचा समावेश होतो.

मिरची लागवड कालावधी अन्‌‍ हवामान

उन्हाळी मिरचीची लागवड मुख्यतः जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान केली जाते. या काळात हवामान उबदार असते आणि मिरची पिकासाठी योग्य असते. मिरचीच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी 25 ते 35 अंश दरम्यानचे तापमान अनुकूल मानले जाते. उन्हाळ्याच्या हंगामात चांगल्या निचऱ्याची क्षमता असलेल्या जमिनीत मिरचीचे उत्पादन उत्तम होते. या कालावधीत लागवडीच्या सुरुवातीला आर्द्रता आवश्यक असते. मात्र, जास्त ओलसरपणा किंवा सतत पाणी साचल्यास झाडांच्या मुळांना हानी पोहोचू शकते.

मिरचीच्या उत्तम जाती अन्‌‍ कोणती खते वापरावीत…

पुसा ज्वाला, पंत सी-1, संकेश्वरी 32, मुसाळवाडी, अग्निरेखा, फुले सई, फुले ज्योती व जी-4, गौरी शार्क 1 लाली या जाती उपयुक्त मानल्या जातात. हेक्टरी एक ते दीड किलो बियाणे वापरावेत. पूर्वमशागतीत शेणखत 10-12 टन प्रतिहेक्टर वापरावे. सेंद्रिय खत कंपोस्ट/गांडूळ खत 2-3 टन प्रतिहेक्टर वापरावे किंवा नायट्रोजन 50 किलो प्रतिहेक्टर, फॉस्फरस 25 किलो प्रतिहेक्टर, पोटॅशिअम 25 किलो प्रतिहेक्टर आणि वाढीच्या टप्प्यावर 15-20 दिवसांच्या अंतराने नायट्रोजन खत द्यावे. युरिया (1-2 टक्के) किंवा झिंक सल्फेट (0.5 टक्के) फवारणी करावी.

असे करावे जलव्यवस्थापन

उन्हाळ्यात पिकांना दररोज 5-7 मिमी पाण्याचा पुरवठा आवश्यक असतो. उन्हाळ्यात पाण्याची गरज जास्त असते. त्यावर ठिबक सिंचन हा एक उत्तम उपाय आहे. तसेच जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक किंवा सेंद्रिय मल्चिंगचा वापर करावा. पाणी साठवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करावा.

‌‘लाल मिरची‌’चा ‌‘दोंडाईचा ब्रँड‌’ परराज्यांतही प्रसिद्ध!

दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील लाल मिरची तिच्या जाड सालीसाठी आणि गडद लाल रंगासाठी ओळखली जाते, जी वाळल्यानंतर अधिक आकर्षक दिसते. ‌‘दोंडाईचा मिरची‌’ हा स्वतःच एक ब्रँड असून, येथील मिरची आणि मिरची पावडर आणि मिरची मसाला महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील घराघरांत पोहोचली आहे. येथे पारंपरिक पद्धतींसोबतच आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे मिरची पावडर तयार करण्याचे मोठे प्रक्रिया उद्योग आहेत. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजही दररोज शेकडो क्विंटल मिरचीची आवक होते. केवळ स्थानिक विक्रीच नव्हे, तर येथील काही व्यावसायिक आता परदेशातही मिरची निर्यात करत आहेत.

हिरव्या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडीच महिन्यांनी सुरू होते. पूर्ण वाढलेल्या व सालीवर चमक असलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह 10 दिवसांच्या अंतराने करावी. हिरव्या मिरच्यांची तोडणी सुरू झाल्यानंतर तीन महिने तोंडे सुरू राहतात. अशा प्रकारे 8 ते 10 तोडे सहज होतात. वाळलेल्या मिरच्यांसाठी त्या पूर्ण पिकून लाल झाल्यावरच त्यांची तोडणी करावी. जातीपरत्वे (बागायती) हिरव्या मिरच्यांचे हेक्टरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन मिळते. वाळलेल्या लाल मिरच्यांचे उत्पादन 9 ते 10 क्विंटल निघते व कोरडवाहू मिरचीचे उत्पादन 6 ते 7 क्विंटल निघते.

मिरची विविध प्रकारच्या जमिनीत उगवू शकते. वाळूमिश्रित मातीपासून जड मातीपर्यंत. मात्र, मिरचीसाठी सर्वोत्तम माती चांगल्या प्रकारे निचरा होणारी, हलकी, सुपीक आणि ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असलेली असावी. हलक्या जमिनीत जड मातीपेक्षा चांगल्या दर्जाची फळे मिळतात. मिरची पिकासाठी 6 ते 7 स्तर असलेली जमीन आदर्श मानली जाते. पावसावर आधारित लागवडीसाठी काळी माती उपयुक्त ठरते. कारण, ती ओलावा टिकवून ठेवते. तसेच सिंचनासाठी डेल्टाईक माती आणि वाळूमिश्रित मातीसारख्या चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनी अधिक योग्य मानल्या जातात.

  • यंदाच्या हंगामात प्रवासाचे प्रमाण जास्त असल्याने मर रोगांच्या प्रादुर्भावाने मिरची पिकाचे नुकसान झाले. मिरची उत्पादन घेण्यासाठी उंच गादीवाफा आणि सरीचा वापर केला जातो. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी सरी पद्धतीचा वापर केला, त्यांना अतिवृष्टीमुळे नुकसानीस सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून, प्लास्टिक मल्चिंग, फर्टिगेशन तंत्रज्ञान, रोगकिडींना प्रतिरोधक वाणांचा वापर करणे गरजेचे आहे. उंच गादीवाफा पद्धतीने मिरची लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊईन उत्पादनात वाढ होईल.
    – पद्माकर कुंदे (विषय विशेषज्ञ- पीक संरक्षण, डॉ. हेडगेवार सेवा समिती- कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार)
  • जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण उच्च मूल्याचे पीक म्हणून मिरची पीक असून, गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्धता, एकात्मिक पीक व्यवस्थापन, उत्पन्न लक्ष्य दृष्टिकोन आणि उत्पादन, ड्राइंग पार्क (पीक वाळविण्याची व्यवस्था), साठवण, प्रक्रिया व मूल्यवर्धन, तसेच निर्यातीसाठी अनेक संधी आहेत.सद्यःस्थितीत विविध स्तरांवर मिरचीसाठी गृहोद्योग, शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे, वैयक्तिक उद्योग सुरू आहेतच. त्यास अद्ययावत तंत्रज्ञान व योजना सहाय्य यांची जोड देऊन अधिक सक्षम मिरची क्लस्टर तयार होण्यास मदत होईल.
    आर. एस. दहातोंडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. हेडगेवार सेवा समिती- कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---