---Advertisement---
जळगाव–भुसावळ मार्गे गुजरातमधील उधनापर्यंत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने उधना–खुर्दा रोड दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गुजरात, महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ०९०५९ क्रमांकाची उधना–खुर्दा रोड साप्ताहिक विशेष गाडी आता २५ फेब्रुवारीपर्यंत धावणार आहे. त्याचप्रमाणे ०९०६० क्रमांकाची खुर्दा रोड–उधना परतीची विशेष गाडी २७ फेब्रुवारीपर्यंत चालवली जाणार आहे. या दोन्ही गाड्यांच्या वेळापत्रकात किंवा थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या विशेष गाड्या गुजरात, महाराष्ट्र आणि ओडिशा या तीन महत्त्वाच्या राज्यांना जोडत असल्याने प्रवाशांचा मोठा भार या मार्गावर असतो. त्यामुळे गाड्यांना देण्यात आलेली ही मुदतवाढ प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्यास उपयुक्त ठरणार आहे. याआधीही रेल्वे प्रशासनाने गुजरातकडून उत्तर भारतात जाणाऱ्या काही विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला असून, माघ यात्रेनिमित्त प्रयागराजकडे जाणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त थांबेही मंजूर केले आहेत.
या विशेष गाडीला व्यारा, नंदुरबार, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, तुमसर रोड जंक्शन, गोंदिया, दुर्ग, रायपूर यांसह सुमारे ३० प्रमुख स्थानकांवर थांबा आहे. त्यामुळे विविध जिल्हे व राज्यांतील प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.









