---Advertisement---
जळगाव शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, घरफोडी आणि वाहनचोरीनंतर आता चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली. ही घटना जळगावातील मोहाडी रस्त्यावरील नयनतारा रेस्ट हाऊससमोर घडली आहे.
खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय ५८, रा. मोहाडी रोड) हे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक असून, ते नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. चालताना त्यांनी नाश्ता केला आणि त्यानंतर ईच्छादेवी चौफुली मार्गे पायी घरी परतत असताना मोहाडी रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांनी त्यांना अडवले.
यावेळी दुचाकीवर बसलेल्या एका इसमाने तोंडाला मफलर बांधलेला होता. तो खाली उतरून थेट साहित्या यांच्या डोळ्यात स्प्रे मारला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे साहित्या गोंधळले. त्यानंतर आरोपीने त्यांना मारहाण केली. साहित्या जमिनीवर कोसळताच आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने ओढून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेनंतर साहित्या यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.









