---Advertisement---
न्यू यॉर्क : डॉक्टर लक्षणांद्वारे तसेच अन्य तपासण्यांद्वारे आजार ओळखतात. आता यापुढील काळात यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात् एआयची मोठी मदत मिळणार असून, अमेरिकेत एका प्रयोगादरम्यान एआयने माणसांच्या झोपेद्वारे तब्बल १३० आजारांचे निदान केले आहे.
अमेरिकेतील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीसह अनेक संस्थांमधील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ‘स्लीप एफएम’ नावाचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल’ (एआय) तयार केले आहे. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हे मॉडेल माणसाच्या एका रात्रीच्या झोपेच्या आधारावर १३० आजारांच्या धोक्याची भविष्यवाणी करू शकते.
मॉडेलच्या भविष्यवाणीची सी इंडेक्सवरील अचूकता ०.७५ पेक्षा जास्त आली आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, ती ७५ टक्क्यांपेक्षा
जास्त अचूक आहे. कोणत्याही कारणामुळे मृत्यूच्या धोक्याचा अंदाजाचाही यात समावेश आहे.
‘स्लीप एफएम पीएसजी’ (पॉलीसोम्नोग्राफी) डेटाच्या आधारावर आजाराचा धोका सांगते. याला ६५ हजार लोकांच्या ५.८५ लाख तासांपेक्षा जास्त पीएसजी रेकॉर्डच्या माध्यमातून प्रशिक्षित केले गेले आहे. यांचा आरोग्य रेकॉर्ड स्टॅनफर्डच्या स्लीप क्लिनिकमधून घेण्यात आला. संशोधकांच्या मते, रेकॉर्डमध्ये एक हजारपेक्षा जास्त आजारांच्या श्रेणी होत्या. यापैकी १३० आजारांची भविष्यवाणी झोपेच्या डेटाच्या आधारावर अचूकपणे करण्यात आली.
आठ तास ठेवले जाते लक्ष
स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या मनोचिकित्सा आणि वर्तन विज्ञान विभागातील स्लीप मेडिसिनचे प्राध्यापक आणि संशोधनाचे वरिष्ठ लेखक इमॅन्युअल मिग्नोट म्हणाले, झोपेच्या अभ्यासात मोठ्या संख्येने संकेत नोंदवले जातात. आठ तास अशा व्यक्तीवर लक्ष ठेवले जाते, जो पूर्णपणे नियंत्रणात असतो.
विविध डेटाची माहिती एकत्र करते ‘एआय’
ते म्हणाले की, एआय मॉडेल अनेक प्रकारच्या डेटाला एकत्र जोडून समजून घेते. यात मेंदूची क्रिया (ईईजी/ईओजी), हृदयाचे ठोके (ईसीजी/ईकेजी), स्नायूंची क्रिया (ईएमजी) आणि श्वासोच्छश्वासाशी संबंधित संकेतांच्या आधारावर झोपेची लपलेली शरीरक्रियाविज्ञान (फिजियोलॉजी) आणि वेळेनुसार बदलणारे नमुने (पॅटर्न) वाचले जातात.।









