---Advertisement---
जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली विशेष साधारण सभा आज पार पडली. ही सभा नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्षपदासाठी डॉक्टर प्रशांत भोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया न करता त्यांची थेट बिनविरोध घोषणा करण्यात आली.
याच सभेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वीकृत नगरसेवकपदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेल्या तीन नावांना मंजुरी मिळाल्याने प्रल्हादराव सोनवणे, दीपक डांगी आणि विश्वास पर्वते यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्यात आली.
निवड झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथून फोनद्वारे सर्व नवनिर्वाचितांचे अभिनंदन केले. तसेच नगराध्यक्ष साधना महाजन आणि गटनेत्या संध्या जितेंद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोपे देऊन नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला. सभेच्या प्रारंभी नगरपरिषद मुख्याधिकारी नितीन बागुल यांनीही सर्व नगरसेवकांचा सत्कार केला.
या विशेष सभेला सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. निवड जाहीर होताच नगरपरिषद चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला.









