---Advertisement---
देशातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या मुंबई महापालिकेसाठी काल मतदान पार पडल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. जसजसा वेळ पुढे सरकत गेला, तसतसे मुंबईतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होत गेले. सुरुवातीच्या कलांमध्येच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची आघाडी दिसू लागली.
मतमोजणीच्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने मिळून १२७ जागांवर आघाडी घेतली आहे. महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला 114 जागांचा बहुमताचा टप्पा गाठण्यासाठी त्यांना आता केवळ सहा जागांची गरज आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा फडकण्याची शक्यता बळावली आहे.
दुसरीकडे, तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणूक युतीत लढवली. मात्र अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेला नाही. या युतीला आतापर्यंत केवळ ७१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे मुंबईच्या सत्तेसाठी ही युती पिछाडीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्याच्या कलांनुसार, भारतीय जनता पक्ष ९८ जागांवर, शिवसेना (शिंदे गट) ३१ जागांवर आघाडीवर आहे. मनसे 9 तर शिवसेना (ठाकरे गट) ६२ जागांवर पुढे आहे. ९५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या आकड्यांवरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची युतीच मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, ठाकरे बंधूंनी “मुंबई वाचवा” या घोषणेसह मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत मतदारांपर्यंत भावनिक आवाहन केले होते. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो आहोत, असा संदेश त्यांनी दिला. मात्र मतदारांनी या भावनिक सादेला अपेक्षित प्रतिसाद दिलेला दिसत नाही.
शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि शरद पवार यांच्या गटाने एकत्र निवडणूक लढवूनही त्यांना मर्यादित यश मिळाले आहे. मनसेला सोबत घेतल्यानंतरही उद्धव ठाकरे यांना मोठा फायदा झाला नसल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे. सध्याच्या स्थितीत हा निकाल ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.









