---Advertisement---
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेले नियोजन महत्त्वाचे ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेषतः निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे आमदार मंगेश चव्हाण आणि शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या समन्वयपूर्ण कामगिरीचा या यशात निर्णायक वाटा राहिला.
महापालिका निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे सोपवली होती. यापूर्वी जिल्हा दूध संघात सत्तांतर घडवून आणणे, जिल्हा बँक तसेच अलीकडील नगरपालिका निवडणुकांमधील यशस्वी कामगिरी या पार्श्वभूमीवर त्यांच्या संघटन क्षमतेवर नेतृत्वाचा विश्वास होता. ही जबाबदारी आमदार चव्हाण यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडत पुन्हा एकदा आपली रणनीती प्रभावी ठरवली.
निवडणुकीपूर्व सुमारे वीस दिवस आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव शहरात मुक्काम करून प्रत्यक्ष आघाडीवर काम केले. या काळात त्यांनी आमदार राजूमामा भोळे यांच्यासोबत सातत्याने समन्वय साधत महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि अन्य वरिष्ठ नेत्यांशी नियमित चर्चा करत निवडणुकीची दिशा निश्चित करण्यात आली.
स्थानिक सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा सखोल अभ्यास करून उमेदवार निवड प्रक्रिया राबविण्यात आली. जुन्या कार्यकर्त्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी देत संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका आमदार मंगेश चव्हाण यांनी निभावली. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी आमदार राजूमामा भोळे यांना भक्कम पाठबळ दिले, हे चित्र शहरभर दिसून आले.
दरम्यान, मराठा समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांना पुढे केल्याने या समाजाचा मोठा पाठिंबा महायुतीला मिळाल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आखलेली रणनीती, आमदार मंगेश चव्हाण यांचे नियोजन आणि आमदार राजूमामा भोळे यांची साथ यामुळेच जळगाव महापालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन झाली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.









