---Advertisement---
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि महायुती आघाडीवर असून, राज्याचे विशेष लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेतही महायुतीच्या बाजूने निकाल झुकताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकालांवर तसेच ठाकरे बंधूंच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या कामगिरीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘डबल इंजिन’ सरकारच सक्षम आहे, असा विश्वास जनतेने व्यक्त केला आहे. मागील निवडणुकांप्रमाणे यावेळीही ग्रामीण भागासह शहरी मतदारांनी विकासाला पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे. सध्याचे कल पाहता महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल आणि एकूण नगरसेवकांपैकी सुमारे ५१ टक्के जागांवर भाजप विजयी ठरेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत ठाकरे बंधूंना मतदारांनी नाकारण्यामागे काय कारण आहे, यावर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांच्या विकासात्मक दृष्टिकोनावर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप महायुतीवर आणि डबल इंजिन सरकारवर मुंबईकरांनी विश्वास टाकला, त्यामुळे विरोधी आघाडीला अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, असे ते म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली होती, तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना साथ दिली होती. मात्र तरीही मुंबईतील मतदारांनी या आघाडीला नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
मुंबई महापालिकेच्या निकालांकडे पाहिले असता भाजप आणि शिवसेना मिळून सुमारे १३० जागांवर आघाडीवर आहेत. त्यातील काही जागांवर उमेदवारांनी विजयही निश्चित केला आहे. ठाकरे बंधूंच्या गटाला सुमारे ७१ जागांवर आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना युती आघाडीवर असून, नाशिकमध्येही भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. एकूणच या निकालांमुळे राज्यातील बहुतांश महानगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकताना दिसणार आहे.









