मुंबईच्या महापौर पदावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…

---Advertisement---

 

राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. या निकालांमध्ये मुंबई महानगरपालिकेचा निकाल सर्वाधिक चर्चेचा ठरला. मुंबई जिंकण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही घटक पक्षांनी मोठ्या ताकदीने प्रचार केला होता. अखेर निकालानंतर मुंबईत महायुतीची सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुंबईचा महापौर कोण होणार, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. भाजप की शिंदे गटाची शिवसेना, महापौरपद कुणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिल्याने महापौरपदाचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

राज्यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर मुंबईत पक्षातर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही यावेळी उपस्थित होते. फडणवीस यांनी मुंबईसह राज्यातील महापालिकांमधील विजय हा जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा परिणाम असल्याचे सांगितले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केले असून, त्याचेच फलित या निकालातून दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

निवडून आलेल्या उमेदवारांना त्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून काम करण्याचा सल्ला दिला. कोणताही भ्रष्टाचार न करता नागरिकांची प्रामाणिक सेवा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जनतेने दिलेला कौल ही मोठी जबाबदारी आहे, याची जाणीव ठेवून काम करावे, असे फडणवीस म्हणाले.

मुंबईच्या महापौरपदाबाबत मात्र त्यांनी थेट नाव जाहीर केले नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महापौर भाजपाचाच होणार का, असा प्रश्न उपस्थित होत असताना त्यांनी सूचक भूमिका मांडली. मुंबई महापालिकेत महायुतीला स्पष्ट विजय मिळाल्याने महापौरपद महायुतीकडेच राहील, असे विधान त्यांनी केले. मात्र, नेमका महापौर कोण असेल, हे त्यांनी स्पष्ट न केल्याने आता या पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---