---Advertisement---
जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करून नुकसान करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या हल्ल्यामुळे वाहनाच्या काचा फुटल्या असून मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे.
माहितीनुसार, विष्णू भंगाळे यांची कार त्यांच्या घराबाहेर नेहमीप्रमाणे उभी करण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी या वाहनाला लक्ष्य करत दगडफेक केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नुकसान झालेल्या वाहनाची पाहणी करण्यात आली. मात्र, हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
या घटनेनंतर विष्णू भंगाळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. हा प्रकार अपघाती नसून पूर्वनियोजित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वाद किंवा वैरातूनच ही दगडफेक झाली असावी, असा संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









