---Advertisement---
बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेतली असून, तब्बल २५ वर्षांपासून सत्तेत असलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना (ठाकरे गट) यावेळी पिछाडीवर पडली आहे. मुंबईतील सत्तासंरचनेत झालेल्या या बदलामुळे भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शिंदे गटाची साथ भाजपला मिळणार आहे. या निकालानंतर राजकीय वर्तुळासह समाजमाध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर सिनेअभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौतने दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेने तिच्या घरावर केलेल्या कारवाईचा उल्लेख करत कंगनाने या निकालाकडे ‘न्याय मिळाल्याचा क्षण’ म्हणून पाहिलं आहे.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला अपेक्षित यश मिळालं नाही. दोन्ही पक्ष मिळून साधारण ७५ जागांपर्यंतच मजल मारू शकले. यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने आनंद व्यक्त केला असून, भाजपच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. तीन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवर वर्चस्व असलेल्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला प्रथमच इतक्या ठळकपणे ढासळल्याचं तिने म्हटलं आहे.
निकालानंतर बोलताना कंगना राणौत म्हणाली की, “ज्या लोकांनी मला शिवीगाळ केली, धमक्या दिल्या, माझं घर पाडलं आणि मला महाराष्ट्र सोडण्यास सांगितलं, त्यांनाच आज जनतेनं सत्तेच्या बाहेर ढकललं आहे. महिलांचा द्वेष करणाऱ्यांना आणि दहशतीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवली, याचा मला आनंद आहे.”
दरम्यान, बीएमसी निकालानंतर कंगनाचा २०२० मधील एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तिच्या कार्यालयावर कारवाई झाल्यानंतरचा आहे. त्या वेळी कंगनाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हटलं होतं की, “आज माझं घर पाडलं गेलं आहे, उद्या तुमचा अहंकाराचा किल्ला कोसळेल. काळाचं चक्र कधीच थांबत नाही.” हा व्हिडिओ सध्या पुन्हा चर्चेत आला असून, सध्याच्या निकालाशी त्याची सांगड घातली जात आहे.









