---Advertisement---
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि धुळे या तिनही महापालिकांमध्ये भाजप आघाडीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. हा निकाल एखाद्या राजकीय योगायोगाचा परिणाम नाही तर सातत्यपूर्ण काम, स्पष्ट विचारधारा आणि संघटनशक्तीचा थेट जनतेकडून मिळालेला कौल होय. विरोधक असलेल्या शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या पक्षांना हा निकाल धक्का वाटतोय. कारण त्यांनी अजूनही आत्मपरिक्षणाऐवजी सबबींचा आधार घेतला असल्याचेच समोर येते आहे. निवडणुकीपूर्वी निष्ठावंत विरूद्ध नवीन कार्यकर्ते असा जो काही सुर सर्वत्र आळविला गेला तो काही काळानंतर थांबला आणि सारेच कामाला लागले. संधी मिळावी ही अपेक्षा करणे चुकीचे अजिबात नाही, पण तेच शेपुट धरून बंडखोरी करणे याला निष्ठा म्हणता येणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या जीएम फाऊंडेशनमधील कार्यालयासमोर एक दृश्य पहायला मिळाले आणि निष्ठा काय असतात याचा दृष्टांत झाला. ऐनवेळी तिकीट नाकारलेले उदय भालेराव व तात्या उर्फ सुभाष शौचे हे पक्षाच्या सदस्यांचा विजय व मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करत फटाके फोडत होते, यालाच निष्ठा म्हणतात… अशा व्यक्तीमत्वांना सलाम…! या निवडणुकीत शिवसेना (उबाठा), शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष निवडणूक रिंगणात उतरले खरे पण त्यांची परिस्थिती ‘टांगा पलटी, घोडे फरार’ अशीच झाली आहे. पक्षचिन्ह, विचारधारा, नेतृत्व आणि दिशा या सगळ्याच बाबतीत निर्माण झालेला गोंधळ मतदारांपर्यंत पोहोचला आणि त्याचा थेट परिणाम निकालांवर दिसून आला आहे. शिवसेना उभी ठाकली खरी पण ती कोणत्या मुद्यांवर कोणाच्या नेतृत्वाखाली आणि कोणाच्या विरोधात हे सामान्य मतदारास उमगले नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस परंपरा आणि वारसा सांगत राहिली तर अजित पवारांचा गट सत्तेचा वास्तववाद सांगत राहीला. या दोघांच्या संघर्षात राष्ट्रवादीचा मूळ चेहरा हरवला आणि मतदार संभ्रमात पडला, दोन्ही गटांना अपेक्षित यश कोठेही मिळाले नाही. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर मालेगाव सारख्या शहरातील चित्र विचार करण्याजोगे आहे. संख्येने समान असताना हिंदू उमेदवार केवळ २५ टक्के विजयी झाले. हा राजकीय आत्मपरिक्षणाचा विषय आहे. हिंदू समाजाची मते विखुरली की काय होते याचा साक्षात्कार लोकसभा निवडणुकीच्या वेळी धुळे लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्रात झालेल्या मतदानावेळी आलाच होता. केवळ या क्षेत्रातील मतदानामुळे निकालाची दिशाच बदलली होती तरी आम्ही जागे व्हायला तयार नाही. या निवडणुकीत काही बंडोबांनाही धडा मिळाला आहे. आपण मोठे की पक्ष मोठा, विचारधारा महत्वाची याचा काही जणांना विसर पडला होता; त्यांनाही त्यांची जागा दिसून आली.
पक्षाने नव्याने संधी दिलेले सुनील महाजन दाम्पत्य, नितीन लढ्ढा, नितीन बरडे यांना अपेक्षित यश मिळाले. शिवसेना शिंदे गटातील उमेदवार विष्णू भंगाळे व अन्य काही जणांनाही चांगले यश लाभले. एकीने लढल्याचे परिणाम या ठिकाणी दिसून आले. संघटीत विचारशक्तीच नेहमी वरचढ ठरते याचाच प्रत्यय येथे आला. राजकीय पक्षांनी केवळ आघाड्या, युती आणि फाटाफुटी यावर लक्ष केंद्रीत न करता स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, विकास, सुरक्षा आणि सामाजिक समतोल यावर ठोस भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र प्रचारात वैयक्तीक टीका, अंतर्गत संघर्ष आणि सत्तासमिकरणे या मुद्यांनाच प्राधान्य दिले गेले. मतदांनीही याला उत्तर देतांना पारंपरिक निष्ठा बाजुला ठेवून वेगळे निर्णय घेतले.
काही निकाल तर धक्कादायकच ठरले. यात प्रामुख्याने प्रफुल्ल देवकर या नवख्या कार्यकर्त्याने भाजपतून बंडखोरी करणाऱ्या माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांचा पराभव केला. माजी मंत्री देवकरांची धूर्त रणनिती प्रफुल्ल यांच्या कामी आली. आप्पा शांत पण कुणाचा कसा गेम करतील… (राजकीय) याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला..!
नाशकात संकटमोचक गिरीशभाऊंची शक्ती पुन्हा एकदा दिसून आली. धूर्त रणनितीच्या आधारावर व पक्षातून अनेक नाराजांना अंगावर घेऊन त्यांनी मोठे यश मिळविले. धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल यांच्यापुढे मोठे आव्हान होते. राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट बरोबर नव्हता. हिंदू मते विखुरल्याने येथे एमआयएमचे १० नगरसेवक निवडून आले. मात्र आमदार अनुप अग्रवाल यांनी धूर्त रणनितीच्या आधारे यश मिळविले. जळगावात आमदार सुरेश भोळे यांनीही अनेक संकटांवर मात करत ‘हम भी कुछ कम नही…’ हेच दाखवून दिले आहे. अनेकांना ‘मामांनी’ प्रेमाने जिंकत पक्षाला यश मिळवून दिले. त्यांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची साथही मोलाची ठरली.
विरोधकांना जळगावातील अपयशाची चाहूल पहिल्यापासून होती असेच लक्षात येते. कारण भाजप-शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रत्यक्ष दौरा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांशी केलेले मोबाईल संभाषण प्रभावी ठरले. विरोधकांकडून प्रमुख असे कोणीही आले नाही… याचेच परिणाम दिसून आले आहेत. यश तर मिळाले, मात्र आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. त्या दृष्टीने भविष्याचे नियोजन करणेच आता अपेक्षित आहे.









