ग्राहकांना धक्का! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी 3 लाखांच्या पुढे, सोन्यानेही गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर?

---Advertisement---

 

भारतात सोन्या-चांदीच्या किमतींनी सोमवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठत बाजारात खळबळ उडवून दिली. दर कमी होण्याची अपेक्षा असलेल्या ग्राहकांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये झालेली ही वाढ आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या टप्प्यांपैकी एक मानली जात आहे.

आज सोन्याचा दर थेट १ लाख ४५ हजार रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. त्याचवेळी चांदीनेही नवा इतिहास रचला असून, पहिल्यांदाच १ किलो चांदीचा भाव ३ लाख रुपयांच्या वर गेला आहे. यामुळे गुंतवणूकदारांबरोबरच सर्वसामान्य ग्राहकांचेही लक्ष या दरवाढीकडे वेधले गेले आहे.

आजच्या व्यवहारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १,९१० रुपयांची वाढ नोंदवली गेली असून भाव १,४५,६९० रुपयांवर स्थिरावला आहे. २२ कॅरेट सोन्याचे दरही १,७५० रुपयांनी वाढून १,३३,५५० रुपये झाले आहेत.

चांदीच्या किमतींमध्ये तर आणखी तीव्र चढ-उतार पाहायला मिळाला. एका दिवसात तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाल्याने १ किलो चांदीचा दर ३,०५,००० रुपयांवर पोहोचला आहे. आजपर्यंत चांदीने कधीही हा आकडा ओलांडलेला नव्हता.

या दरवाढीमागे जागतिक पातळीवरील अस्थिर परिस्थिती हे प्रमुख कारण मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव, वाढती अनिश्चितता आणि अमेरिकेने युरोपीय देशांवर लादलेले अतिरिक्त शुल्क यामुळे बाजारात अस्वस्थता वाढली आहे. या घडामोडी ट्रम्प यांच्या ग्रीनलँडविषयक धोरणाशी संबंधित असल्याचे संकेत दिले जात आहेत. परिणामी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीकडे मोर्चा वळवला असून त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे.

राज्यातील जळगाव सराफ बाजारातही याचे पडसाद उमटले आहेत. येथे सोन्याच्या दरात सुमारे २ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात १० हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ४८ हजार रुपयांपर्यंत पोहोचला असून, चांदीचा दर जीएसटीसह ३ लाख ३ हजार ८५० रुपये झाला आहे.

सध्या बाजारातील वातावरण पाहता, येत्या काळात या दरांमध्ये कितपत स्थिरता राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---